हर्ष भटकळ
सुभाष अवचट आपल्या चित्राबद्दल सांगतात, ‘जे तुम्ही अजाणता शिकत असता, तेच टिकत असते.’ त्यांच्या व्यक्तिचित्रणात कृत्रिमता का नसते, ते लक्षात येते. त्यांचा शेतकरी हा निवळ समाजाचा घटक नसतो, कामगार हा प्रतीकात्मक रूप धारण करत नाही, तो विमुक्त साधू हा काही अज्ञानाचा शोध घेणारा ठोकळेबाज धडपडणारा नाही, तर ते सर्व त्यांच्या आठवणीतील वास्तव आहे. ते सांगतात, ‘मी शेतकऱ्यांचे चित्र काढायचे असे ठरवून काढत नाही. मी त्यांच्या सोबतच घडत गेलो.’
सुभाष अवचट यांच्या स्टुडिओत शिरता शिरताच मी काही विचारण्यापूर्वीच ते हळुवारपणे सुरुवात करतात... ‘आपण फार तात्त्विक चर्चेत शिरूया नको, उगाच वायफळ सैद्धान्तिक चर्चा नको. आपण आपले बोलत बसूया.’ असा प्रेमळ आग्रह तांत्रिक शब्दजंजाळातून निसटण्यासाठी नव्हे तर त्यांची ती विचारपद्धतीच आहे. ते कलेकडे एक जीवनपद्धती म्हणूनच पाहतात. समजून घेणे किंवा विश्लेषण करणे म्हणून नव्हे, खरे समरस होणे हे महत्त्वाचे, त्याचे विश्लेषण वगैरे नंतर आणि जर त्यासंबंधी लिहायचे असेलच तर ते अशा भाषेत की लोकांना त्यात न घाबरता सहभाग घेता येईल.
सुभाष अवचट यांना मी अनेक वर्षे ओळखतो. मी लहान असताना माझे प्रकाशक वडील रामदास भटकळ यांचे लेखक, कवी, रंगकर्मी, सामाजिक आणि राजकीय चळवळीत भाग घेणारे कार्यकर्ते अशांचे एक मोठे वर्तुळ होते. पुढील पिढीत ती नाती बदलत गेली तरी आमच्यातला संवाद सुरूच आहे. या स्टुडिओत आजूबाजूला चित्रातून शेतमजूर, भटके साधू, निनावी शोधक आणि पिवळी धमक शेती पाहिल्यावर लक्षात येते की त्यांचा कलात्मक प्रवास याची जडणघडण ही शैलीतील बदल पाहून नव्हे तर जीवनातील आठवणी, विचारांची शिस्त आणि त्यांची सचोटी लक्षात घेऊन जोखण्याची आहे.
योजनाबद्ध प्रयत्न नाहीतअवचट यांची पुण्यातील वर्षे आर्ट स्कूलभोवती फिरत नव्हती. ती घडत गेली पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणात. ‘पुण्याचे जग हे काही निर्विकार नव्हते. लोक एकमेकांना भेटत असत. आम्ही कोणाच्याही घरात सहजतेने संचार करू शकत.’ ते सोळा वर्षांचे असताना त्यांनी पुस्तकासाठी पहिले मुखपृष्ठ तयार केले. बावीस वर्षांपर्यंत ते वाङ्मयीन गटात सामील झाले होते. लेखक, कुमार गंधर्व-भीमसेन जोशी यांच्यासारखे संगीतकार घरी येत असत. ‘कोणत्याही शाळेच्या वर्गापेक्षा मी त्यांच्या सान्निध्यात शिकत होतो. जाहीर व्याख्यानांना गर्दी होत असे आणि अनेकदा सभागृह भरून रस्त्यावर श्रोते उभे राहायचे. नाटक पाहणे हा काही फक्त रजेच्या दिवसांतला विरंगुळा नव्हता, तर ते एक सामाजिक कर्तव्य होते. त्या काळात टेलिव्हिजन नव्हता. मोबाइल फोन नव्हते.’ ते आठवण करून देतात. तेव्हा उगाचच गहिवरून न जाता ते बोलत होते. पण त्यांची नजर विश्लेषक होती. ‘लेखकांना विशेष मान होता.’
अवचट यांच्या उदरनिर्वाहाच्या दृष्टीने मुखपृष्ठ तयार करणे याला महत्त्व प्राप्त झाले. जाहिरातींच्या कामामुळे ते त्यांचा खर्च भागवू शकले. मुखपृष्ठ तयार करताना कटपेस्ट, टाइपसेटिंग, लेटरिंग इत्यादींची गरज असे. शाई वाळेपर्यंत थांबावे लागे. ‘पुस्तकांच्या मांडणीचे काम हे फक्त उरकून टाकण्याचे काम नसे. त्यासाठी साथ जुळावी लागे.’ पुस्तकांच्या कामातील व्यग्रतेमुळे त्यांची नजर तयार झाली. त्यांनी मजकुरातील साजेसे चित्र काढणे यावर समाधान न मानता ते त्या वातावरणात शिरत. ग्रंथातील मजकूर आणि चित्रे यातील अंतर त्यामुळे धूसर होत असे.
ओतूरचे अजाण दिवसअवचट यांचा जन्म जरी पुण्यातला असला, तरी त्यांची जडणघडण ही ओतूर ह्या लहान गावात झाली. या गावातील निसर्गरम्य स्थळे त्यांच्या पेंटिंग्जमध्ये पुन्हा पुन्हा जिवंत होतात. ‘रंगसंगती आणि विषय यांची जाण मला ह्या भानातून मिळाली.’ शांतपणे ते कबूल करतात. पावसात भिजलेली तांबडी माती, हिरवीगार शेते, शेवंतीच्या माळा, पाण्यात डुंबणाऱ्या म्हशी, भीतीपेक्षा कुतूहल जागृत करणारे साप, भ्रमण करणारे साधूपुरुष, रेंगाळत हेल काढत बोलणारे शेतकरी हे सारे. त्यांचे संयुक्त कुटुंब असे होते की साऱ्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायचे आणि शिस्तीत वागायचे, तरीही मोकळेपणा वाटायचा. शाई स्वतः कशी तयार करायचे हे ते सांगतात, लिहायला बॉलपेन नसल्यामुळे बोरू असायचे. सुलेखन हे चित्रकलेचा भाग म्हणून नव्हे तर एक आवश्यक बाब झाली होती. अनेक वर्षानंतर त्यांना कॅलिग्राफीच्या संस्थेत सुवर्णपदक मिळाले. त्याचे सुरुवातीचे धडे त्यांना ह्या ओतूरच्या दिवसांत मिळाले. तिथे बॉलपेन नसतानाही. ‘जे तुम्ही अजाणता शिकत असता, तेच टिकत असते.’
त्यांच्या व्यक्तिचित्रणात कृत्रिमता का नसते ते लक्षात येते. त्यांचा शेतकरी हा निवळ समाजाचा घटक नसतो, कामगार हा प्रतीकात्मक रूप धारण करत नाही, तो विमुक्त साधू हा काही अज्ञानाचा शोध घेणारा ठोकळेबाज धडपडणारा नाही तर ते सर्व त्यांच्या आठवणीतील वास्तव आहे. ‘मी शेतकऱ्यांचे चित्र काढायचे असे ठरवून काढत नाही. मी त्यांच्या सोबतच घडत गेलो.’
Premium|Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोकादायक खेळ; पिढीच्या भावनिक नात्यांवर संकट व्यक्तिनिष्ठ चित्रण ही शैली नाहीत्यांच्या चित्रांत व्यक्तिचित्रण येत जरी असले तरी त्यांच्यावर वास्तववादी चित्रकार असा शिक्का त्यांना मान्य नाही. ‘मी लोकांत राहतो. त्यांच्याशी बोलतो, मग ते का नाही माझ्या पेंटिंग्जमध्ये घुसणार?’ मानवाकृती त्यांच्या चित्रांत येणे हे त्यांना अटळ वाटते. शेतकरी, हमाल, विदूषक आणि साध्या नेहमीच्या पोषाखातील शुभ्र धोतरातील माणसे, निरुद्देश भटकणारी माणसे ही त्यांच्या कामात येतातच. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन भरले तेव्हा त्यांना बजावण्यात आले की शेतकऱ्यांची चित्रे कोण आपल्या दालनात लावणार? कामगारांची चित्रे विकत कोण घेईल? ‘पण विकली जातील म्हणून मी मोरांची चित्रे काढत बसणार नाही.’ या प्रदर्शनात ही ताकीद खोटी ठरली. त्यांच्या पेंटिंग्जची विक्री चांगली झाली. ‘नेमके कारण सांगता येत नाही. कदाचित मी लोकांच्या आवडीपेक्षा माझी आत्मनिष्ठा मानत आलो म्हणून असेल!’ ‘परंपरा’ या त्यांच्या सुरुवातीच्या काळातील चित्रमालिकेत काही बोडकी माणसे पूजेचे साहित्य हातात घेऊन एकत्र हिंडताना दाखवली आहेत. कोण ही चित्रे भिंतीवर लावणार हा प्रश्न त्यांना विचारला गेला त्यानंतर वीसएक वर्षांनी देखील त्या चित्रांना संग्राहकांकडून (कलेक्टर) मागणी आहे. ‘पुन्हा कोणी मालिकेत तेच तेच दाखवू शकणार नाही.’ त्यांना याची जाणीव आहे. ‘पण तुम्ही ते वर्ज्यही करू शकत नाही.’ त्यांच्या कामातील मर्म हेच आहे. परिवर्तन तर हवेच पण परित्याग नको.
अमूर्ताचे आकर्षण आणि मर्यादात्यांच्या कामात असा एक टप्पा आला होता जेव्हा त्यांना अमूर्ताचे (ऐब्स्ट्रक्ट) आकर्षण वाटू लागले. प्रवासात त्यांची नजर बदलत गेली. जॉर्डनमधील पेट्रा येथील दगडातील दर्शनी कला, पॅरिस शहरातील रस्ते, बँकॉकमधील बुद्धाची लवंडलेली प्रतिमा आणि त्यावर अनुयायांनी शतकानुशतके चढवलेला सोनेरी वर्ख या सगळ्यांचा परिणाम होता. ‘सोनेरी हा एक फक्त रंग नव्हे’ असे ते आग्रहपूर्वक सांगतात. तो एकाच वेळी मनातील प्रतिबिंबित करतो आणि ते लपवतोही. तो एक आभास आहे. भक्त जेव्हा सोन्याने मूर्ती मढवतात तेव्हा एक गोष्ट त्यांच्या निदर्शनात आली, सोने जसे साचत जाते तसे त्यांच्या भक्तीला वरवरच्या आवरणाचे स्वरूप येते. सोने बाहेरून चकाकते पण आतून सारे तसेच राहते. ‘बाहेरून आभास पण आतून सारे निश्चल.’ पर्वतांना त्यांच्या रचनेचे रूप आले, झाडांच्या आकृती दिसू लागल्या, माणसांचे शरीर हा एक निसर्गातील आकृतिबंधच आहे, दगडधोंडे यांच्यापेक्षा काही पवित्र नव्हे; आणि त्यांच्या दृश्य रूपात काही फरक दिसेना. दोन्ही तितकीच क्षणभंगुर, सेझान ह्या थोर चित्रकाराचा निर्वाळा देत मानवी शरीर हे तसे विविध आकारमयच. एखाद्या निसर्ग दृश्यापासून त्यात वेगळे काही नाही. तरीही अमूर्ताची आराधना ही एक फॅशन होऊ नये याची ते काळजी घेतात. ‘तुम्ही अचानक एक दिवस सकाळी उठून असे ठरवू शकत नाही की मी आता अमूर्ताचाच चित्रकार आहे. ही जाणीव जर अनुभवसिद्ध नसेल तर ती एक नाटकी युक्ती ठरते.’
जाहिरातींचे काम आणि भ्रमनिरासपेंटिंग्जवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी अवचट यांनी पुस्तकांची सजावट आणि जाहिरातीच्या विश्वात बरेच काम केले. त्यासाठी पुरस्कार मिळाले आणि पाठोपाठ मानसन्मानही. त्यांनी कष्टपूर्वक तयार केलेल्या पूर्णपानी जाहिरातीचा काही भाग त्यांच्या मुलाच्या एका वहीच्या कव्हरवर छापलेला त्यांना दिसला. ‘त्याचक्षणी लक्षात आले हे सारे यश दिखाऊ आणि क्षणिक आहे.’ त्यांचे या संबंधीचे आकर्षण संपले. केवळ स्वतःसाठी चित्रे काढणे ह्याच्याशी दुर्लक्ष झाले होते हे त्यांच्या लक्षात आले.. ‘स्वान्तसुखाय केलेले ड्रॉइंग हेच टिकते. बाजारपेठेसाठी केलेले काम नव्हे.’ त्यांनी अशा कामासाठी वापरलेला आपला स्टुडिओ बंद केला आणि पूर्णवेळ पेंटिंग्ज करायचे ठरवले. पुन्हा प्रदर्शनाची तयारी केली.
मोहनगरीचे मिथक आणि कलेचा बाजारअवचट यांचे बरेच स्नेही सिनेसृष्टीतील कलावंत आहेत. ते कलेच्या मागणीबद्दल मोकळेपणाने बोलतात. ‘त्यांच्या प्रदर्शनाला येण्याचा आणि चित्राच्या मागणीचा काही संबंध नाही.’ त्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला नटनटी आल्यामुळे गर्दी झालेली त्यांना आठवते. पण त्यात चित्रे विकत घेऊन संग्रह करणारे क्वचित असायचे. वर्तमानपत्रातील बातम्या यांमध्ये लोकप्रिय कलाकारांचा उल्लेख असायचा, पण चित्रकार किंवा त्यांच्या कलेबद्दल दुर्लक्षच. ‘चित्रांची गुणवत्ता जर फक्त त्यांच्या किमतीवर ठरत असेल तर तो एक सामाजिक रोगच आहे.’ त्यांनी असेही काही चित्रकार पाहिले आहेत त्यांच्याकडे त्यांच्या हयातीत फक्त दुर्लक्ष झाले आहे आणि त्यानंतर त्यांच्या कामाला ओळख मिळाली आहे. काही नवशिके चित्रकार प्रदर्शनावर बराच खर्च करतात तरी त्यांच्या चित्रांची विक्री होत नाही.
संगणकीय कलेबद्दल नावडसंगणकीय कलेमुळे त्यांना काळजी वाटते. ‘आधी हाताने चित्रे काढायला शिका’ असे ते आवर्जून सांगतात. ‘इतिहास वाचा, तुमच्या मातीचा सुवास आणि पोत समजून घ्या.’ मूलभूत शिक्षणाऐवजी सोप्या आडमार्गाचा वापर यांची त्यांना चिंता आहे. त्यांना कल्पना आहे की आजचे तरुण चित्रकार हे तांत्रिक बाबतीत पारंगत आहेत. त्यांच्यात चतुराई आहे आणि निरनिराळ्या माध्यमांशी त्यांची सलगी असते. जे विद्यार्थी रेखाटनावर पकड सिद्ध करून नाटकीपणा न करता त्यांचा प्रयोग करतात, जे ऑइल पेंटिंग, ॲक्रेलिक आणि मिश्र पद्धतीचे आणि संगणकीय कला अशा विविध माध्यमांतून काम करतात त्यांच्याबद्दल अवचटांना कौतुक वाटते. ‘मला खात्री वाटते की यापुढील पिकासोसारखा थोर चित्रकार हा या नवीन पिढीतून तयार होईल आणि तोही बहुधा हिंदुस्थानातील छोट्या शहरातून.’
‘ते भीत नाहीत, ते शोध घेत असतात’ असे अवचट म्हणतात.
भाषा, विश्लेषण आणि कलामीमांसाकलेबद्दलचे लेखन प्रादेशिक भाषांत व्हायला हवे. ‘का म्हणून सारे काही इंग्रजीतूनच व्हावे?’ असा त्यांना प्रश्न पडला आहे. बंगालमध्ये कलाचर्चा ही बंगाली भाषेतून होत असते आणि हैद्राबादमध्ये तेलुगु भाषेत. मग मराठीत का नाही? जर ‘आपल्याला कलेत काही समजत नाही असे लोक म्हणत असतील तर ते सारे घाबरवणारे असे करून ठेवले आहे म्हणून. सिनेमा पाहण्यापूर्वी तुम्हाला तो समजतो का?’ अवचट विचारतात. ‘नाही ना! तुम्हाला सिनेमाचा पाहून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो.’ त्यांच्या मते चित्र एकदा पूर्ण झाले की चित्रकाराचा त्याच्या निरनिराळ्या अर्थावरील अधिकार संपतो. त्यानंतर ते चित्र पाहणाऱ्याचे होते. ‘चित्र पाहणे म्हणजे काही परीक्षा देणे नव्हे!’
अस्वस्थता हीही एक पद्धतआजकाल अवचट काहीतरी नवीन करू पाहत आहेत. त्यात मूर्त आणि अमूर्त यांचे मिश्रण आहे तरी यात काहीही वर्ज्य केलेले नाही. त्यांचा हा प्रयोग अजून चालूच आहे. त्यांच्या अर्धवट पडलेल्या कामाकडे पाहत ते म्हणतात. जगभर कीर्ती व्हावी अशी त्यांची जिद्द नाही. त्यांच्या चित्रांच्या मिळकतीवर ते यशाचे मोजमाप करत नाहीत. त्यांचे लक्ष आहे ते शांत राहून आपले काम प्रामाणिकपणे करण्यावर. ‘मी त्या एका क्षणाच्या शोधात आहे. जेव्हा मला जो आकार सापडेल तो खरा वाटेल.’ ते अस्वस्थ असताना या असंतुष्टतेतून त्यांच्या कामाला ऊर्जा मिळते. कवीला जसे कविता पूर्ण झाली असे कधीच वाटत नसते, तसे ते स्वतःला सांगत असतात. ‘स्वतःची फसवणूक करू नकोस! जे करायचे ते प्रामाणिकपणे कर!’
पुढील वाटचालसुभाष अवचट यांच्या कलेचे रूप निवळ दर्शनी नाही. ते सर्वसंग्राहक आहे. त्यात त्यांच्या ओतूर गावच्या आठवणी आहेत, साहित्यिक प्रतिभा आहे. त्यासाठी शिस्तशीर साधना आहे. नाटकी फॅशनचा त्यांना तिटकारा आहे आणि सचोटीवर श्रद्धा आहे. पुस्तकांसाठी चित्रणापासून पेंटिंग्जपर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे. खेडी आणि शहरे असा संचार करताना त्यांनी मूल्यविचार बाजूला केला नाही. त्यांनी बाजार पेठेचा अनुभवही घेतला आहे. त्याचप्रमाणे संगणकीय कृत्रिमताही अनुभवली आहे. मध्यंतरीचा संग्राहकांचा लयही अनुभवला आहे आणि नवीन पिढीचा उदयही. या सगळ्यातून एक तथ्य जाणवते. ड्रॉइंग हा सराव आहे तर पेंटिंग्ज ही साक्ष आहे. त्यांच्या स्टुडिओमध्ये अर्धवट काढलेल्या चित्रांकडे पाहताना आणि अनुत्तरित प्रश्नांना सामोरे जाताना जाणवते की याला अंत नाही. हे सारेच चालूच राहणार आहे आणि सारे अर्धवट, उत्सुक, तरी प्रामाणिक असे ठेवणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.