पात्र झोपडपट्टीधारकांचे होणार पुनर्वसन
शिवमंदिर-वालधुनी घाट प्रकल्पातील बाधितांना दिलासा
उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण आणि वालधुनी नदी घाट विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा पेच अखेर सुटण्याची चिन्हे आहेत. अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून, पात्र बाधितांचे शासनाच्या नियमानुसार पुनर्वसन केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
शिवमंदिर आणि वालधुनी नदीकाठच्या विकासकामांमुळे अंबरनाथ-उल्हासनगर सीमेवरील काही बांधकामे बाधित होत आहेत. प्रशासनाने केलेल्या संयुक्त पाहणीत एकूण ३१ बांधकामे (३० घरे आणि १ दुकान) या प्रकल्पाच्या आड येत असल्याचे समोर आले आहे. ही घरे सुमारे २५ ते ३० वर्षे जुनी असल्याने, पर्यायी जागा मिळाल्याशिवाय घरे न हटविण्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला होता.
अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पत्राद्वारे पुनर्वसन प्रक्रियेबाबत महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित धोरणानुसार पात्र झोपडपट्टीधारकांना निवासासाठी पर्यायी घरे उपलब्ध करून दिली जातील, असे म्हटले आहे. तसेच लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून कोणावरही अन्याय होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाईल. पुनर्वसनाची संपूर्ण कार्यवाही नियमानुसार आणि टप्प्याटप्प्याने राबविली जाईल, असे आश्वासित केले आहे.
तणाव निवळण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून या निष्कासन कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. मात्र, नगर परिषदेने अधिकृतपणे पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारल्याने बाधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन्ही नगरपालिकांच्या समन्वयाने आता हा विकास प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.