कल्याणजवळ शिक्षण संस्थेचा अनुदान घोटाळा? २ एकरऐवजी ७.५ एकर जमीन दाखवून कोट्यवधींची फसवणूक
Saam TV March 10, 2026 11:45 PM

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणजवळील नांदकर गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा उभारण्यासाठी केवळ २ एकर जमिनीचा करार असताना साडेसात एकर जमीन असल्याचे दाखवून कोट्यवधी रुपयांचे शासकीय अनुदान मिळवल्याचा आरोप शिक्षण संस्थेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी संस्थेच्या सचिवांविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसह संबंधित शासकीय विभागाकडून चौकशी सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण नजीक भिवंडी तालुक्यातील नांदकर गावातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाने शाळा उभारण्यासाठी सुरुवातीला जमीन मालक आणि सहमालकांसोबत साडेसात एकर जमिनीचा करार केला होता.

Good News: मुंबईवरून नवी मुंबईला जा सुसाट, ४० मिनिटांचा प्रवास फक्त १० मिनिटात; सरकारचा जबरदस्त प्लान

मात्र अवघ्या आठवड्याभरात संस्थेच्या मागणीनुसार हा करार रद्द करून फक्त २ एकर जमिनीचा नवीन करार करण्यात आला. यानंतर या जागेवर डी.बी. स्कूल आणि वस्तीगृह उभारण्यात आले. 2019 पासून शाळा सुरू असून काही वर्षांनी जमीन सहमालकांनी संस्थेकडे शाळेचा आर्थिक हिशोब मागितला असता संस्थेकडून वारंवार टाळाटाळ करण्यात आल्यामुळे सहमालकांनी माहितीच्या अधिकारात कागदपत्रांची मागणी केली. त्यामधून मिळालेल्या माहितीत धक्कादायक बाब समोर आली असून प्रत्यक्षात संस्थेकडे फक्त २ एकर जमिनीचा वैध करार असताना शासकीय कागदपत्रांमध्ये साडेसात एकर जमीन असल्याचे दाखवण्यात आल्याचे समोर आले.

Ground Report : महायुद्धाची महाराष्ट्राला झळ; मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर... ४०० कंपन्या बंद होणार? जिल्हा जिल्ह्यात परिस्थिती काय?

तक्रारदारांचे वकील ॲड. सागर चव्हाण यांनी आरोप केला की, या बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्थेने शासनाकडून शाळेसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी जमीन सहमालकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर पडघा पोलीस ठाण्यात संस्थेचे सचिव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट; तापमानाचा पारा जाणार चाळीशीपार

दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित विभागाकडूनही अनुदानाच्या कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आरोप सिद्ध झाल्यास शिक्षण क्षेत्रातील अनुदान प्रक्रियेतील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.