कर्मवीर मध्ये "जागतिक महिला दिन" उत्साहात साजरा
esakal March 10, 2026 10:46 PM

कर्मवीरमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

विरार, ता. १० (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. कनिष्ठ महाविद्यालय, जुचंद्र येथे ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसई-विरार महापालिकेच्या नगरसेविका व शाळेच्या माजी शिक्षिका प्रमिला पाटील, विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी ज्योती दीपक म्हात्रे तसेच उद्योजिका माधुरी विलासराव जगताप कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांचाही जागतिक महिला दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे सभासद सदस्य विनय पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा रायगड विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकेतून जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि त्यामागील इतिहास स्पष्ट केला. विद्यालयातील सर्व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी महिला सुरक्षेवर आधारित अप्रतिम नृत्य सादर केले. तसेच कनिष्ठ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणावर आधारित अप्रतिम भारुड व पोवाडा सादर केला. उपस्थित पाहुण्यांनी ही आपल्या मनोगतातून महिला सशक्तिकरण व महिलांचे समाजातील योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या कार्याची माहिती सांगितली. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रंगनाथ नाडेकर व विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय म्हात्रे यांनीही आपल्या मनोगतातून महिलांच्या संघर्षाची, कर्तृत्वाची आणि समाजातील त्यांच्या अनमोल योगदानाची महती अधोरेखित केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.