उच्चशिक्षित असलेला आनंद रक्ताची चाचणी करून घ्यायला घाबरतो. त्याच्या मनात एचआयव्ही होण्याची भीती असते. त्याला वाटतं कदाचित आपल्या आधी ज्या व्यक्तीचं रक्त घेतलं गेलं होतं तीच सिरींज आपल्यासाठी वापरली नसेल? त्याला गर्दीतून चालण्याची भीती वाटते. न जाणो एखाद्याच्या उघड्या जखमेचा स्पर्श आपल्याला होईल आणि आपल्याला संसर्ग होईल.
त्याला बाहेर वडापाव खायचीही भीती वाटते. न जाणो तिथल्या कांदा कापणाऱ्या व्यक्तीला खरचटलं असेल आणि ते रक्त कांद्यातून आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला इन्फेक्शन होईल. वास्तविक आत्ता सांगितलेल्या कुठल्याही कारणातून त्याला एचआयव्ही इन्फेक्शन होऊ शकणार नाही. इन्फेक्शन होण्याची कारणं वेगळी आहेत हे त्याला पूर्ण माहिती आहे. तरी त्याला अशा प्रकारची भीती वाटत राहाते. मग तो मनात कसला तरी मंत्र म्हणतो. तोंडातल्या तोंडात पुटपुटतो.
प्रज्ञाला घराच्या दरवाज्याला किंवा गाडीला कुलूप लावल्यानंतर ते नीट लागलंय की नाही हे खूप वेळ तपासत राहते. अजयला आपल्याला जंतुसंसर्ग होईल याची भीती वाटत असते, म्हणून तो वारंवार हात धूत असतो. आदित्यला रस्त्याने जाताना वाहनांच्या नंबरप्लेट मधल्या आकड्यांची बेरीज करत राहायची सवय आहे.
ही सगळी ऑबेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डरची (ओसीडी) (साध्या शब्दात - छळवादी विचार आणि निरर्थक मंत्रचळ लागल्यासारखी एकच कृती वारंवार करणे) लक्षणे असू शकतात. या आजारात नको असणारे, निरर्थक, तर्काला न पटणारे विचार, प्रतिमा इत्यादी पुन्हा पुन्हा व्यक्तीच्या मनात येतात. अशी व्यक्ती या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेतून सुटका होण्यासाठी त्या विचारांशी निगडित कृती वारंवार करीत रहाते.
उदा. बाहेरून घरात आलेल्या एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपल्याला जंतुसंसर्ग होईल, तर त्या भीतीतून मुक्ततेसाठी वारंवार हात धूत रहाते. ‘ओसीडी’ हा अस्वस्थतेचा आजार आहे. अनेकदा तो इतर मानसिक आजारांबरोबरसुद्धा असू शकतो. मेंदूतील न्युरोकेमिकल्स बाबतचे असंतुलन (विशेषत: सेरोटिन इ.), आनुवंशिकता इत्यादी गोष्टी कारणीभूत असू शकतात.
ओसीडीग्रस्त व्यक्ती अनेक प्रकारांपैकी पुढीलपैकी एका प्रकारात मोडते -
वारंवार हात धुणारे : यांना नेहमी जंतुसंसर्गाची भीती वाटत असल्यामुळे समाधान होईपर्यंत हात वारंवार धूत राहतात.
वारंवार तपासणारे : दाराचं किंवा गाडीचं कुलूप नीट लागलाय की नाही, हे वारंवार तपासत रहातात.
संशयी आणि पाप भावना : यांंना प्रत्येक गोष्ट अति व्यवस्थित लागते. तशी ती नसल्यास जबरदस्त शिक्षा होईल अशी भीती मनात असते.
अकारण आकडे मोजणे, त्यांची बेरीज करणे वगैरे : यांना विशिष्ट आकडा, वस्तू, रचना, रंग इत्यादीविषयी अंध:श्रद्धा असतात.
जुन्या, निरुपयोगी वस्तू साठवणारे : साठवलेल्या (विनाकारण) गोष्टी फेकून दिल्या तर काहीतरी शिक्षा घडेल, अशी भीती असते.
काहीवेळा कुणाच्याही मनात कधीतरी अति ध्यास असलेले, छळवादी विचार येतात किंवा हातून क्वचित मनात नसतानाही वारंवार एकच कृत्य करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. म्हणून ती व्यक्ती ‘ओसीडी’ग्रस्त आहे असं नव्हे. अशा व्यक्तींचं वागणं थोडं विचित्र असतं, त्यात तर्कसंगती नसते परंतु अशा व्यक्ती दैनंदिन जीवन विना अडथळा जगू शकते.
या उलट ‘ओसीडी’ग्रस्त व्यक्तीचा बराचसा वेळ ‘ओसीडी’चे विचार आणि वर्तन यामध्ये जातो. त्यांना अस्वस्थतेचा इतका त्रास होतो की दैनंदिन जीवन जगणं कठीण होऊन जातं. ‘ओसीडी’ची लक्षणे काळानुसार कमी जास्त होतात. तसेच ताण तणावाच्या वेळेस अधिक तीव्र होतात. त्याची माहिती पुढील भागात घेऊयात.