तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची संंकलित मूल्यमापन चाचणी (पॅट-२) ११, १५ व २२ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी पहिली भाषा, १५ एप्रिलला गणित व २२ एप्रिलला इंग्रजी (तिसरी भाषा) विषयाचा पेपर होणार आहे. दरम्यान, पॅटसाठी उपस्थित विद्यार्थीच त्या शाळांची पटसंख्या गृहीत धरली जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी, गणित व इंग्रजी या विषयांचे पेपर ‘एसईआरटी’ने ठरवून दिलेल्या तारखेलाच घेणे शाळांसाठी बंधनकारक आहे. या तिन्ही विषयांच्या चाचण्या ‘एसईआरटी’कडून पुरविण्यात येणार आहेत. बाकीच्या विषयांचे पेपर शाळांना ११ ते २२ एप्रिल या काळात (११, १५ व २२ एप्रिल सोडून) घेता येतील. ‘पॅट-२’अंतर्गत पेपर सुरु असताना शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी बहुतेक शाळांना अचानक भेटी देणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ठरविलेल्या तारखेला सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. पेपर झाल्यावर सर्व प्रश्नपत्रिका शाळांनी जतन करून ठेवायच्या आहेत.
शिक्षकांनी उत्तरपत्रिका कशा तपासल्या आहेत, परीक्षा झाल्यानंतर काही लिखाण करण्यात आले आहे का, मुद्दामहून गुण वाढविण्यात आले आहेत का, अशा बाबींची पडताळणी अधिकारी उत्तरपत्रिकांच्या तपासणीद्वारे करणार आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणी व त्यात वाढ करणे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणमधील संपादणूक वाढविणे, अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी कृतीकार्यक्रम तयार करणे, यासाठी ‘पॅट’ घेतली जाते. त्यामुळे पारदर्शकपणे ही परीक्षा घ्यावी, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
सर्व विद्यार्थी ‘पॅट’ला उपस्थित राहावेत
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अंतिम सत्राच्या संकलित मूल्यमापन चाचणीचे (पॅट-२) वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसारच शाळांना इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे त्याच विषयांचे पेपर घ्यायचे आहेत. ‘पॅट’ला जेवढे विद्यार्थी उपस्थित राहतील ती त्या शाळेची पटसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी परीक्षेला हजर राहतील, याची शाळांनी दक्षता घ्यावी.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
पाचवी अन् आठवीसाठी ढकलपास बंद
इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना ढकलपास करून पुढच्या वर्गात पाठविण्याची पद्धत बंद झाली आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये पुन्हा परीक्षा द्यावी लागते. तत्पूर्वी, संबंधित विषय शिक्षकांनी त्यांचे अतिरिक्त मूल्यमापन करणे अपेक्षित आहे. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जतन करून ठेवाव्या लागतात. शिक्षणाधिकारी त्या उत्तरपत्रिकांची कधीही तपासणी करु शकतात.