तात्या लांडगे
सोलापूर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राज कुमार आणि अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचा कार्यकाळ संपला आहे. हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी बदलीसाठी पात्र आहेत; पण त्यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोलापूरचा लळा लागला आहे. त्यामुळे त्यांना काही महिने मुदतवाढ मिळेल, अशी आशा आहे. दुसरीकडे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, आरटीओ (प्रादेशिक परिवहन अधिकारी) गजानन नेरपगार यांचाही कार्यकाळ तीन ते पाच महिनेच राहिला आहे. या अधिकाऱ्यांनीही शहर-जिल्ह्यात चांगले काम केले असून त्यांनाही जिल्ह्यात काम करण्याची आणखी संधी हवी आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना तीन वर्षांहून अधिक काळ काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आशीर्वाद यांच्याकडे जबाबदारी आली. त्यांचा कार्यकाळ सात महिन्यांपूर्वीच पूर्ण झाला आहे. तर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांचा कार्यकाळ ५ फेब्रुवारीला संपला आहे.
दरम्यान, यापूर्वी अहमद जावेद, पी. पी. श्रीवास्तव, बी. डी. मोरे व पी. एन. रासकर या तत्कालीन पोलिस आयुक्तांना तीन वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यामुळे एम. राज कुमार यांनाही एक वर्षाची मुदतवाढ मिळू शकते, अशी सोलापूरकरांची मागणी आहे. अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून जूनमध्ये पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अदलाबदल होऊ शकते.
अधिकाऱ्यांनी कधी घेतला पदभार...
(1) कुमार आशीर्वाद : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जुलै २०२३ मध्ये पदभार स्वीकारला. जुलै २०२५ मध्ये त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. जिल्ह्यातील सीना नदीला पहिल्यांदाच मागील पावसाळ्यात महापूर आला होता. त्यावेळी पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे, या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होऊ नये आणि बाधितांना लवकर शासनाची मदत मिळावी, यासाठी त्यांनी चांगले काम केले.
(2) एम. राज कुमार : पोलिस आयुक्त
एम. राज कुमार यांनी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी पदभार स्वीकारला. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांनी शहराला डीजेमुक्त केले. अनेक संवेदनशील गुन्ह्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखली. सामान्यांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. दोन वर्षांत ५० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करून येरवडा कारागृहात पाठवून त्यांनी नवा विक्रम केला.
(३) प्रीतम यावलकर : अपर पोलिस अधीक्षक
नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रीतम यावलकर यांनी पदभार स्वीकारला. गावकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन मार्ग काढणारा, सामान्यांपासून आपल्या विभागातील सर्वांना सांभाळून घेणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा स्वभाव शांत आहे; पण शिस्तीबाबत ते कडक आहेत. अनेकांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना लगेच हो म्हणणारा अधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२५ मध्ये संपला आहे.
(४) अतुल कुलकर्णी : पोलिस अधीक्षक
अतुल कुलकर्णी यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये पदभार घेतला. साडेचार महिन्यांनंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईल. त्यांनी समाजातील तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहात आणून त्या सर्वांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, शिक्षणातून नोकरी आणि समाजमान्य व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी ऑपरेशन ‘पहाट’ राबविले. जिल्ह्यातील २५ पैकी बहुतांश पोलिस ठाणी चकाचक करून तेथे वृक्षलागवड केली. मुख्यालयात त्यांनी स्वतंत्र नर्सरीही केली आहे.
(५) कुलदीप जंगम : जिल्हा परिषद सीईओ
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ प्रशासक म्हणूनच गेला. आता १८ मार्चनंतर जिल्हा परिषदेत पदाधिकारी असतील. सीईओ जंगम यांना पदाधिकाऱ्यांसमवेत तीन महिनेच कारभार करता येईल, कारण जून २०२६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांचा बराच काळ कार्यालयातील बैठकांमध्येच गेला आहे.
(६) भाग्यश्री जाधव : एसपी, राज्य उत्पादन शुल्क
२० ऑगस्ट २०२४ रोजी भाग्यश्री जाधव यांनी सोलापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक म्हणून पदभार घेतला. त्यांनी ‘हातभट्टीमुक्त सोलापूर’साठी योगदान दिले. बनावट दारू निर्मिती, अवैध दारू वाहतूक आणि ढाब्यांवरील अनधिकृत मद्यविक्रीवर त्यांनी विशेष लक्ष दिले. अनेक मोहिमांमध्ये त्या स्वतःही सहभागी झाल्या. त्यांचाही कार्यकाळ पाच महिने राहिला आहे. त्यांच्या कार्यकाळात कार्यालयाची नवीन इमारत व्हावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
(७) गजानन नेरपगार : आरटीओ
धाराशिवचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांची पदोन्नतीने सोलापूरला प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून बदली झाली. जून २०२४ मध्ये त्यांनी पदभार घेतला. त्यांचा कार्यकाळ जून २०२६ मध्ये संपणार आहे. त्यांचा कार्यकाळ आणखी तीन महिने शिल्लक असून त्यांनाही मुदतवाढीची आशा आहे.
(८) विजय कबाडे : पोलिस उपायुक्त
शहर पोलिस दलातील उपायुक्त विजय कबाडे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विशेष कामगिरीबद्दल त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. जून २०२६ मध्ये त्यांचा मुदतवाढीचा कार्यकाळ संपणार आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावत ती प्रकरणे सहजपणे हाताळली. शहरातील चोरी-घरफोड्या कमी होण्यासाठी त्यांनी ‘क्यूआर कोड’ पेट्रोलिंगची नवी संकल्पना राबविली.