Yugendra Pawar : आज गुढीपाडवा निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात मराठी बांधव आपल्या घरांवर गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करत आहेत. राज्यभरात शोभायात्रा काढल्या जात आहे. नवचैतन्य संचारल्या सारखं वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिवंगत अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर करत 'मिस यू अजितकाका' अशी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी दादांच्या मार्गदर्शनाचे आणि मूल्यांचे स्मरण करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे.
युगेंद्र पवार यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने कुटुंबियांसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दिवंगत अजित पवार यांच्या आई तसेच सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबतचे फोटो देखील युगेंद्र पवार यांनी शेअर केले आहेत. तसेच यावेळी 'मिस यू अजितकाका' अशी भावनिक पोस्ट देखील केली आहे.