प्रभादेवीत गुढीपाडव्यानिमित्त वेशभूषा स्पर्धा
प्रभादेवी, ता. १९ (बातमीदार) : गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभादेवी परिसरात सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध वेशभूषा साकारलेल्या स्पर्धकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रभादेवीकर हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा समितीच्या वतीने यानिमित्ताने रॅलीसोबतच वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत लहान मुलांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मीराबाई, वासुदेव, कालीमाता आदींच्या वेशभूषेत सहभागी स्पर्धकांनी आपल्या कलेचे आकर्षक सादरीकरण केले. स्पर्धेतील विजेत्यांना महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक व उद्योजक कौतिक दांडगे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.