महाराजस्व समाधान शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद
esakal March 19, 2026 09:45 PM

नागरिकांना एकाच छताखाली दाखले
कल्याणमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला प्रतिसाद
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत कल्याण (पूर्व) येथे आयोजित शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कोळसेवाडीतील पार्वतीबाई कर्वे हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे जागीच वाटप करण्यात आल्याने नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचले आहेत.

सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, या उद्देशाने आयोजित या शिबिरात उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, इतर विविध आवश्यक महसुली सेवा या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, नगरसेवक नीलेश शिंदे आणि स्नेहल मोरे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांकडून समाधान व्यक्त
एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन दाखले हातात मिळाल्याने उपस्थित लाभार्थ्यांनी महसूल विभागाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. प्रशासकीय पारदर्शकता आणि वेगवान कामाचा हा उत्तम नमुना आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.