रुग्णवाहिका चालकांचा एल्गार
किमान वेतन, महागाई भत्त्यासाठी निवेदन
पालघर, ता. १९ ः पालघर जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांना थेट शासन सेवेत सामावून घ्यावे तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान वेतन, महागाई भत्ता लागू करावा, या मागण्यांसाठी भूमिपुत्र एल्गार संघटना मैदानात उतरली आहे. याच अनुषंगाने पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांना निवेदनही देण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेले रुग्णवाहिका चालक आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळवून देत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन नवीन निविदा प्रक्रिया राबवून चालकांना पुन्हा एकदा कंत्राटदाराच्या माध्यमातून कामावर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाच्या धोरणाशी आणि न्यायालयीन आदेशांशी विसंगत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ डिसेंबर२०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी वाहनचालकांना रिक्त पदांवर समायोजनाने शासन सेवेत सामावून घेण्याचे स्पष्ट निर्देश आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने चालकांना नियमित किमान वेतन श्रेणी, महागाई भत्ता, थकबाकी देण्याबाबत सकारात्मक मत नोंदवले आहे.
----------------------------
आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्र १०-१५ वर्षांपासून चोवीस तास सेवा देत आहेत. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून कंत्राटदारी लादण्याचा प्रयत्न केला, तर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे.