Water Shortage : नाणेकरवाडीत तीव्र पाणीटंचाई; तहान भागविण्यासाठी दररोज १०० टॅंकर
esakal March 19, 2026 09:45 PM

चाकण - नाणेकरवाडी (ता. खेड) येथे पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना दररोज सुमारे शंभर खासगी टँकरद्वारे लाखो रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. विहिरी, बोअरवेलची भूजल पातळी खालावल्याने स्थानिक जलस्रोत कोरडे पडले असल्याने ६० ते ७० हजार लोकसंख्येची तहान भागवताना प्रशासनाची दमछाक होत आहे. शासनाने त्वरित टॅंकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नाणेकरवाडी परिसरात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने येथे कामगार आणि भाडेकरूंची संख्या मोठी आहे. ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर महिनाभरापासून कोरडी असल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) आठवड्यातून केवळ दोनदाच पाणी मिळते, जे अपुरे पडत आहे. परिणामी, नागरिकांना एका टँकरसाठी तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक जेरीस आले आहेत.

प्रशासक नियुक्तीच्या प्रतीक्षेतग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र अद्याप नियुक्ती झालेली नाही. ‘एमजेपी’कडून अधिक पाणी मिळावे, यासाठी खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत लवकरच स्वतःहून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

दृष्टिक्षेपात

  • ५० हजार - लोकसंख्या

  • ५ हजार रुपये - पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची किंमत

  • १०० टँकर - दररोज गरज (खासगी)

यामुळे समस्या गंभीर

  • भूजल पातळी लक्षणीयरीत्या खालावली

  • रहिवाशांवर,भाडेकरूंची भागेना तहान

  • काही सार्वजनिक नळाचे पाणी गायब

  • खासगी टँकरवर नागरिकांची भिस्त

  • पाणीपुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय गरजेचे

  • पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे.

नागरिक मेटाकुटीला

  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणी आठवड्यातून दोनदा

  • मोठी लोकसंख्या असूनही दोन लाख लिटरच पाणी

  • भाडेकरूना दररोज पाणी विकत घ्यावे लागते.

  • एका टँकरची किंमत तीन ते पाच हजार रुपये

  • नागरिकांचा पाण्यावर लाखो रुपयांचा खर्च

गावाची सार्वजनिक विहीर कोरडी पडल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. एमजेपीचे पाणीही कमी प्रमाणात मिळते. ग्रामपंचायतीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे.

- छाया इरणक, ग्रामविकास अधिकारी, नाणेकरवाडी.

औद्योगिक पट्ट्यातील या गावाची लोकसंख्या ५० हजारांवर आहे. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

- राम जाधव, ग्रामस्थ

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.