श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात भाविकांनी विविध संत-सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेत असताना आपल्या इच्छेलाही मार्ग दाखवला. त्यासाठीच्या इच्छापेटी उपक्रमाचे भाविकांकडून स्वागत करण्यात आले. पादुका दर्शन सोहळ्यात स्वतंत्र इच्छापेटी ठेवण्यात आली आहे. यामध्ये भाविकांनी आपली इच्छा एका अर्जाद्वारे व्यक्त करायची आहे.
Paduka Darshan Sohala
पादुकांच्या दर्शनास सुरुवात होताच अनेक भाविकांनी या इच्छापेटीच्या माध्यमातून स्वतःच्या इच्छेला मार्ग दाखवायला सुरुवात केली. कुणी आध्यात्मिक सेवेसाठी पुढाकार घेण्याची, तर कुणी देणगी देण्यासाठी तयारी दर्शवली. काहींनी आरोग्यविषयक मदत करण्यासाठीही इच्छा व्यक्त केली.
अत्यंत तन्मयतेने भाविक आपल्या इच्छा व्यक्त करीत होते. इच्छापेटीचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यातून अनेक प्रश्न, अनेकांच्या समस्या समाजासमोर येतील आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षाही अर्ज भरताना भाविकांनी व्यक्त केली.
मी पत्नी मृदुला आणि मुलगा जयदीप यांच्यासाेबत श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्याचा आनंद घेतला. एकाच ठिकाणी इतक्या संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा अनुभव विलक्षण आणि अत्यंत भावनिक हाेता. या ठिकाणी मिळालेला शांतता आणि समाधानाचा अनुभव कायम स्मरणात राहील.
- दिलीप सप्तश्री, खार, मुंबई
संतांच्या पादुकांचे एकाच वेळी दर्शन ही संकल्पना खूप छान आहे. नियोजनही अतिशय सुंदर केले आहे. येथे आल्यावर खूप खूप प्रसन्न वाटले. मुंबईत झालेला हा दुसरा साेहळा आहे. जाेपर्यंत श्वास आहे, ताेपर्यंत या साेहळ्यात सहभागी हाेणार आणि पुन्हा पुन्हा हा आध्यात्मिक अनुभव आम्ही घेणार आहाेत.
- दिनेश वैद्य/दीपिका वैद्य, कांदिवली, मुंबई
पत्नीसमवेत संत-महंतांच्या पादुकांचे दर्शन आमच्यासाठी परमसुखाची अनुभूती ठरली. इतक्या संतांच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी हाेणे ही फार दुर्मिळ बाब आहे. या ठिकाणाहून संतांचा आशीर्वाद घेऊन जाताना मनाला समाधान वाटत आहे. खरेच ही भक्तीत न्हाऊन निघालेल्या क्षणाची शिदाेरी कायम आमच्यासाेबत राहील.
- विष्णू पाटील, उल्हासनगर