जिथे भेटायचो आपण...
esakal March 22, 2026 09:45 AM

मंद वारा वाहत होता. क्षितिजावर सूर्याचा लाल गोळा लयास जात होता. संध्याकाळ हलक्या पावलांनी उतरत होती. समोर क्राँक्रीटच्या बिल्डिंगांची काही उंच, काही बुटकी डोकी पसरलेली दिसत होती. मध्येमध्ये हिरवे पुंजके आगंतुकासारखे वाटत होते. ती हातातल्या गवताच्या काड्यांशी खेळत होती, तर तो लहान-मोठे दगड हातात धरून खेळवत बसला होता.

ती : मी लहान असताना बाबाबरोबर या टेकडीवर यायचे ना, तेव्हा समोर हिरवं दिसायचं सगळं. आता तर टेकडीच्या वरपर्यंत बिल्डिंगा, वस्त्या येऊन पोचल्यात.

तो : सगळीकडे असंच घडतंय यार. मी परवा गेलो होतो गावाला. आम्ही लहानपणी सायकलवरून नदीकिनारी खेळायला जायचो, तिथे सगळीकडे बिल्डिंगा उभ्या राहिल्यात. चांगल्या दहा-बारा मजली.

ती : गावांची शहरं होताहेत आणि शहरांची महानगरं, मेट्रो सिटीज.

तो : फार फार पूर्वीपासूनच सुरू झालंय हे. आपण जिथे राहतो ना तिथेही पूर्वी कधीतरी टेकडी असेल किंवा माळरान असेल किंवा दाट जंगलही असेल कदाचित. तिथेही पूर्वी कुण्या पक्ष्यांची घरटी असतील, प्राण्याचं वसतिस्थान असेल, माणसांची वस्ती असेल. कुणाचा तरी अधिवास असेल तो...

ती : आणि तेव्हाची माणसंही म्हणत असतील, ही समोरून वाढत अंगावर येणारा वस्त्यांचा पूर एक दिवस आपल्या टेकडीवरून वाहत जाईल आणि मग इथेच ठाण मांडून बसेल.

तो : युरोपीय वसाहतवादी जसे नवे प्रदेश शोधायला बाहेर पडले आणि जगभरात पसरत गेले. अमेरिकेत गेले, आपल्याकडे भारतात- आशियात आले, आफ्रिकेत गेले. ऑस्ट्रेलिया गाठलं. सगळं पादाक्रांत केलं हळूहळू. सगळ्या व्यवस्था उलथापालथ करून टाकल्या. मूळ लोकांना नेस्तनाबूत तरी केलं किंवा त्यांच्या कॉन्फिडन्सचं खच्चीकरण करून त्यांना गुलाम तरी केलं किंवा शरणार्थी तरी केलं. अर्थव्यवस्था मोडून टाकल्या, नव्या- त्यांच्या फायद्यांच्या उभारल्या... स्थानिक किंवा जागतिक किंवा शेजारपाजारच्या पातळीवर हे चालूच आहे – बळी तो कान पिळी!

ती : म्हणजे आपलंही एक लहानसं स्थानिक वसाहतीकरणच म्हणायचं हे.

तो : होय. आपण बिल्डिंगा उभारतो, मग त्याच्या आजूबाजूला वस्त्या उभ्या राहतात. आपली घरं चालतात, ती त्या वस्त्यांच्या बळावर. नाही का?

Premium|Gen Z: जेन-झी आणि समाज माध्यमांचे गुंतागुंतीचे नाते पालकांच्या दृष्टीकोनातून

ती : तेही खरंच. आणि त्याआधी, खूप आधी आफ्रिकेतून सेपियन्स बाहेर पडले तिथून सुरू होते हे वसाहतीकरण. एका थिअरीनुसार सेपियन्स जिथे जिथे गेले तिथल्या मोठ्या प्राण्यांना त्यांनी मारून टाकलं, राहिले ते लहान प्राणी. त्यानुसार परिसंस्था तयार झाली. एवढंच नाही, तर असंही म्हणतात की सेपियन्सनी निअँडरथल्स यांसारख्या इतर मानवी प्रजातींनाही मात दिली. म्हणजे ही पाळंमुळं किती खोलवर जातात बघ...

तो : म्हणजे माणूसप्राणीच मुळात असा आहे म्हणायचं...

ती : माणूस नव्हे – सेपियन्स! पण हे कुठवर चालू राहणार रे?

तो : कुणास ठाऊक? पण सेपियन्सवर कुरघोडी जो किंवा जे करतील तेच संपवू शकशील. नवं सुरू करतील काहीतरी. फक्त नव्या युगात सेपियन्स गुलाम असतील कदाचित!

ती : म्हणजे हरारी होमो देअस म्हणतो तसं.

तो : हं... काहीही म्हणू यात आपण त्यांना. मी म्हणतो, एआय. अख्खं युग, सर्व व्यवस्था बदलून नवं युगांतर होणार असेल, तर एआय ते करेल. पूर्वी बँका किंवा सेवा देणाऱ्या कंपन्या यांना काही विचारायचं असेल किंवा फीडबॅक द्यायचा असेल तर फोन केल्यावर माणसं बोलायची. कॉल सेंटरमधली. आता एआय असतो बरेचदा किंवा बॉट्स बोलतात. बरेचदा आपल्याला हवा तो ऑप्शन त्यात नसतो किंवा आपल्याला पडलेला प्रश्न त्यात नसतो किंवा आपला ऑप्शन कशात असेल हे समजत नाही. कितीतरी वेळ आपण फिरत राहतो आणि कंटाळून जातो.

ती : ...किंवा सोशल मीडियावर बॉट्स विविध अकाउंट्स निर्माण करून एखादी पोस्ट मुद्दाम बूस्ट करतात. किंवा कमेंट्सही करतात, एवढंच नाही ट्रोलही करतात. एआय खोटे व्हिडियो तयार करतोय किंवा तो ग्रोक तर हवे तसे फोटो बदलून देतोय, माहितेय. कशाला काही धरबंधच नाही...

तो : म्हणजे आपल्याशी नक्की कोण बोलतं आहे हे आता दाट धुक्याच्या पडद्याआड राहतंय. किंवा जे समोर येतंय ते खरं आहे की ‘तयार’ केलंय हे कळेनासं झालंय – म्हणजे व्हिडियोत जो बोलतोय तो खराय की एआय? संवाद या मूलभूत बाबीबद्दलच संदेह तयार केलाय गं आपल्या मनात. सतत संशयाचं वातावरण. सतत खळबळ. सतत अस्वस्थता आणि भरपूर पर्यायांचा डोंगर.

ती : परवा मी कोणत्यातरी ब्रँडचं नाव घेतलं. लगेच मला त्या कंपनीच्या जाहिराती इन्स्टावर दिसू लागल्या. इतकं ऑब्वियस झालंय हे. आता मी सारखी प्रेडिक्ट करते रात्री झोपताना, आज आपण काय बोललो होतो... म्हणजे आता याच्या जाहिराती दिसणार.

अशा सिच्युएशनमध्ये मला तुझ्या गालिब साहेबांचा एक शेर आठवला. एआयला किंवा प्रोग्रॅमला तो सांगावा असं वाटलं –

खुदा के वास्ते पर्दा न काबे से उठा जालिम

कहीं ऐसा न हो याँ भी वही काफ़र सनम निकले

तो : शप्पथ, गालिब... तू ग्रेट का आहेस ते आत्ता समजलं!

ती : ए, थांबू आता. आपण भलतीकडेच भरकटत चाललोय. पण हा जो विकास विकास म्हणताहेत ना सगळे, तोही आपल्या या बोलण्यासारखा वाट्टेल तिकडे चाललाय हेही तितकंच खरं.

तो : स्वच्छ हवा, चांगले टिकाऊ रस्ते, चांगलं व स्वस्त शिक्षण आणि आरोग्यव्यवस्था, समान संधी हे बेसिक आहे यार. ‘विकासा’चं मोजमाप करायचंच असेल तर या क्रायटेरियांवर झालं पाहिजे ना. पण...

ती : ए, मला ना एक रँडम विचार आला मनात. अधलामधलाय हा. ठोस नाहीये. मला काय वाटतं माहितेय – आपल्या शिक्षण-व्यवस्थेत अमूर्ततेच्या गुंत्याशी डील करायला शिकवलंच जात नाही. सतत काहीतरी ठोस, दिसेल, समजेल असं. पण यार अख्खं आयुष्य या गुंत्याने भरलंय. आयुष्य हे प्रकरणच एकमेकांत अडकलेलं आहे. उदाहरण, स्वच्छ हवा पाहिजे म्हणजे नक्की काय? तर प्रदूषण नको. मग कारखाने, वाहनं, बांधकामं अशा कितीतरी गोष्टी नको. पण त्यामागच्या अर्थव्यवस्थेचं, रोजगाराचं काय? म्हणजे शुद्ध हवेसाठी कारखाने बंद केले तर बरीच माणसं भुकेने मरतील. म्हणजे तेही चालणार नाही. आता झाली ना पंचाईत? हा अमूर्त गुंता कसा सोडवायचा हा कळीचा प्रश्न उभा राहतो. त्यावर ठोस, एकच एक उत्तर नसल्याने डायव्हर्ट केलं जातं आपलं लक्ष. पटकन फायदे मिळतील अशा गोष्टींकडे आणि दुसरीकडे विकासाच्या नावाखाली सिमेंटचे मोठ्ठे ठोकळे उभे केले जातात बस्स! जर लहानपणापासून आपल्याला अमूर्त गुंत्यांशी डील कसं करायचं हे शिकवलं ना, तर बरेच प्रश्न सुटतील किंवा प्रश्न सुटतीलपेक्षा काळानुसार नवे उपाय शोधण्याची क्षमता सर्व पिढ्यांना मिळत राहील.

तो : इंटरेस्टिंग आहे हा थॉट. क्रिएटिव्हिटी ही फक्त चित्रकारांची किंवा लेखक-कलावंतांची मक्तेदारी नसते, नाहीये. क्रिएटिव्हिटी म्हणजे ‘छान-छान’, ‘सुंदर’ काहीतरी तयार करणं नसतं. राजकारणी, बिझनेसमन, बिल्डर... असं कुणीही क्रिएटिव्ह असू शकतं. समान संधी मिळेल अशी नवी व्यवस्था निर्माण करणं हीदेखील क्रिएटिव्ह गोष्ट असतेच ना!

ती : येस. मला तसंच काहीतरी म्हणायचंय. पण सगळीच बोंब आहे!

तो : चल, निघू या. अंधार होण्याआधी खाली उतरू या.

ती : हो-हो. चल. जाता जाता एकच फायनल थॉट - आपलं व्यावहारिक जगणं तर सुरूच राहतं. ते अपरिहार्य असतं. पण हे सगळं सुरू होण्याआधीची माणसाच्या मनाची जी अवस्था असेल ना, तिचा शोध घेत राहिलं पाहिजे... शेवटी या समोर वाढत जाणाऱ्या सिमेंटी शहराला वैभव देशमुखचा एक शेर समर्पित –

नसे पक्षी, नसे झाडी, नसे तेथे झरे आता

जिथे भेटायचो आपण, तिथे झाली घरे आता!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.