गुरुमंत्र जपणाऱ्यांना गुरू स्वतः हृदयात अनुभवता येतो आणि पादुका ही त्या अनुभूतीचे एक प्रतीकात्मक रूप आहे. पादुका म्हणजे केवळ एक वस्तू नसून त्यांच्या दर्शनातून गुरूंची उपस्थिती आणि कृपा अनुभवता येते,’ असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू, लेखक आणि जागतिक कीर्तिचे वक्ते श्री एम यांनी केले.
श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री एम यांनी ‘सेवा’ या संकल्पनेचे अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी वर्णन करीत मार्गदर्शन केले. ‘मानवासाठी सर्वांत मोठी सेवा म्हणजे भुकेल्याला अन्न देणे. गुरुद्वारांमध्ये चालणारी लंगर सेवा याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
तेथे २४ तास कोणतीही चौकशी न करता सर्वांना अन्न दिले जाते. अमृतसरमधील एका गुरुद्वारामध्ये श्रीमंत लोकही येऊन अत्यंत नम्रतेने सेवा करतात. जसे की साफसफाई करणे. हीच खरी निःस्वार्थ सेवा आहे,’’असे श्री एम म्हणाले.
आपल्या गुरू महेश्वरनाथ बाबाजी (महावतार बाबाजी) यांच्याशी संबंधित एक विशेष प्रसंग श्री एम यांनी सांगितला. ‘बाबाजींना कोणत्याही भौतिक वस्तूंची आवश्यकता नसतानाही त्यांनी त्यांच्या गुरूंना बनारस येथून पादुका तयार करून आणल्या आणि त्या पादुकांवर बाबाजींनी क्षणभर पाय ठेवावेत, अशी विनंती केली. बाबाजींनी हसत ती विनंती मान्य केली.
त्या पादुकांना मी अत्यंत श्रद्धेने जपून ठेवले आहे. त्या मी अभिजित यांच्या विनंतीवरून आज या सोहळ्यासाठी येथे घेऊन आलो आहे. महेश्वरनाथ बाबाजी अत्यंत साध्या जीवनशैलीत राहत असत. ते अनवाणी चालत, फक्त एक वस्त्र परिधान करीत आणि त्यांच्याजवळ फक्त एक कमंडल आणि एक छोटी पिशवी असे.
नाथ संप्रदायानुसार ते जिथे जात तिथे धुनी लावत असत. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी त्या पादुकांची जबाबदारी माझ्यावर सोपविली. हे एक प्रकारे आध्यात्मिक परंपरेचे हस्तांतर होते,’ असे त्यांनी सांगितले.
साधेपणातूनच लाभते आध्यात्मिक उंची
पादुकांची पूजा मोठ्या विधिपूर्वक करण्याची गरज नाही, तर त्यामध्ये गुरूंची उपस्थिती मानून श्रद्धेने प्रणाम करणे महत्त्वाचे आहे. सेवा, श्रद्धा, गुरुभक्ती यांचे महत्त्व अधोरेखित करीत श्री एम यांनी साधेपणातच आध्यात्मिक उंची प्राप्त होते, हा संदेश दिला.