Existentialism in Marathi Literature : प्रकाशाच्या झगमगाटात अंधाराचा शोध: श्याम मनोहर यांचा लेख
esakal March 22, 2026 09:45 AM

श्याम मनोहर - saptrang@esakal.com

निर्जीवांच्या आत अंधार असतो. पृथ्वीच्या आत अंधार असतो. अंतराळात अंधार असतो. सजीवांच्या आत अंधार असतो. अंधारातर्फे पृथ्वीवरचे सर्व एकमेकांशी विश्वाशी जोडलेले असतात. अंधार हे मूळ तत्त्व?

व्यक्ती हसत म्हणते, ‘‘मला अंधार बघायचाय.’’ बघ की!

कसा बघायचा? बघणे, पाहाणे ह्याचे विज्ञान माहिताय ना? वस्तूवर प्रकाश पडतो, तो वस्तूवरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांत जातो आणि वस्तू दिसते... अंधार बघायचा म्हणजे अंधारावर प्रकाश टाकला पाहिजे. व्यक्ती आपल्या विनोदावर खूप हसते.

आपले डोळे प्रकाशासाठी आहेत. अंधार बघायचा असेल, तर डोळे फोडले पाहिजेत. नको... नको... नाही!

तत्त्वज्ञान म्हणजे, अज्ञान म्हणजे अंधार. ज्ञान म्हणजे प्रकाश. अंधाराला सौंदर्य नसते. अंधारात ऊर्जा नसते. अंधाराचा काहीच उपयोग नाही. अंधार निरुपयोगी? अंधार नष्टच करायचा.

व्यक्तीने घरात, दारात, रस्त्यात दिवे लावले, रोषणाई केली. प्रकाशाचा झगमगाट! जा, जा, अंधारा... व्यक्तीने उघडमिट करणारे दिवे लावले. एकदा प्रकाश, एकदा अंधार! एकदा प्रकाश, एकदा अंधार! रंगबेरंगी दिवे - एकदा ह्या रंगाचा प्रकाश, एकदा दुसऱ्या रंगाचा प्रकाश. व्यक्ती अंधाराला चिडवते. अंधाराला एकच रंग. काळा आणि न दिसणारा.

व्यक्तीने दिसणारा काळा रंग निर्माण केला.

अंधारा, तुझा रंग आम्ही तयार केलाय आणि तो काळा रंग आम्ही पाहू शकतो. हुर्रेऽऽ.

आशावादी म्हणाला,

‘‘पॉझिटिव्ह थिंकिंग करायचे. माणसाने लाखो वर्षांत खूप खूप प्रचंड काम केलंय. ग्रेट साहित्य निर्माण केलंय, ग्रेट कला निर्माण केल्याय. ग्रेट वास्तू निर्माण केल्यात, अजूनही ग्रेट साहित्य, ग्रेट कला, ग्रेट वास्तू निर्माण होत आहेत. माणसाने अनेक ज्ञानशाखा निर्माण केल्यात, ज्ञान निर्माण केलंय. अजूनही नव्या नव्या ज्ञानशाखा निर्माण होताहेत, नवं ज्ञान निर्माण होतंय. माणसाने टेक्नॉलॉजी निर्माण केलीय. टेक्नॉलॉजी रोज निर्माण होतेय. औषधे निर्माण केलीत, निर्माण होताहेत. सर्जरी निर्माण केलीय, माणसाचे आयुष्यमान वाढतेय. प्रवासाची साधने निर्माण केलीत. माणूस जगभर, अंतराळात प्रवास करू शकतोय. पृथ्वीवर लोकशाही येतेय. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची. प्रत्येक व्यक्तीचा विकास घडतोय. शेती सुधारतेय. राष्ट्राराष्ट्रात जागरुकता, एकमेकांना साह्य करणे घडू लागलंय. प्रत्येक व्यक्ती-व्यक्तीचे आयुष्य, जगणे सुकर होणार आहे, समृद्ध होणार आहे. आशावादी व्हा! सुंदर जगायचे. जीवन सुंदर आहे. माणूस पशूंची, प्राण्यांची, पक्ष्यांची, वनस्पतींची, पृथ्वीची जपणूक करायचे पाहतोय. आशावादी राहा!’’

आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘मी जन्माला येईन, असे आशावादी म्हणाला नाही. कसे होणार माझे?’’

****

कोण काय म्हणते?

टेक्नॉलॉजी म्हणते, ‘‘व्यक्तीहो, धावा, पळा, पळा, धावा, मला कवेत घ्या. विकास साधा.’’

चंगळ म्हणते, ‘‘व्यक्तीला मी हवीय.’’

मस्ती म्हणते, ‘‘व्यक्तीला मी हवीय.’’

माज म्हणतो, ‘‘व्यक्तीला मी हवाय.’’

नीती म्हणाली, ‘‘राजाने प्रजेचे हीत पाहिले पाहिजे. राजांनी ऐकले? राजांनी लक्षात घेतले नाही. साम्राज्यशाही आली. प्रदेश बळकावणे घडले. व्यक्तींची लूटमार झाली. बाटवणे झाले. साम्राज्यवाल्यांना कुणीच काही म्हणाले नाही.

धर्म म्हणाला, ‘‘आसपास कुणी उपाशी आहे का बघा, त्याला अन्न द्या आणि नंतर तुम्ही अन्नग्रहण करा.’’

व्यक्तीला प्रमेय कळले. आचरणात आणायचा प्रयत्नही झाला नाही. साम्यवाद म्हणाला, ‘‘श्रीमंतांची संपत्ती सर्वांत वाटा. क्रांती करा.’’ ‘सुपर लक्झुरियस’ जगणे साधलेल्यांना, लक्झुरियस जगणे साधलेल्यांना, कंफर्टेबल जगणे साधलेल्यांना, चांगले जगणे साधलेल्यांना प्रमेय पटले नाही. जगणे न साधलेले चेकाळले. रक्तपात झाला. क्रांती अयशस्वी झाली.

संपत्ती

समाजवाद म्हणाला, ‘‘सर्व व्यक्ती समान आहेत.’’

सिद्धान्तापलीकडे काही झाले नाही.

भांडवलशाही म्हणाली, ‘‘वैपुल्य!’’ ॲबन्डन्स!! अन्न, वस्त्र, निवारा... वस्तू ह्यांची इतकी इतकी निर्मिती करायची की, प्रत्येक व्यक्तीला सर्व मिळेल. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तित्त्व फुलेल.

सुपर लक्झुरियस जगणे साधलेल्यांना, लक्झुरियस जगणे साधलेल्यांना, कंफर्टेबल जगणे साधलेल्यांना, चांगले जगणे साधलेल्यांना प्रमेय पटले. जगणे न साधले गेलेले गोंधळून गेले.

लोकशाही आली. निवडणुकीत प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता म्हणतो, माझे सरकार सत्तेवर आल्यावर गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा देणार. गुन्हेगार म्हणतो, धर्म येऊ द्या, साम्यवाद येऊ द्या, समानवाद येऊ द्या, भांडवलशाही येऊ द्या, ... आणखी काय काय आणा.. आम्ही वादातीत, कालातीत असतो. आम्ही चिरंजीव आहोत. सरकार म्हणते, आम्ही एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही.

जनता म्हणते, सुरक्षा कुठेय?

व्यक्ती म्हणते, मृत्यू न कळत यावा. झोपेत यावा. म्हणजे... तुम्ही रस्त्याने मजेत चाललाय आणि मोटार तुमच्यावर.. तुम्हाला चिरडून मोटार पसार... असा?

छे! छे!

तुम्ही गाढ झोपेत आहात आणि भूकंप होतो.. छत तुमच्यावर कोसळते.. असा?

छे! छे!

पाऊस. तुम्ही झाडाखाली उभे, वीज पडते... तुमच्यावर.. असा?

छे! छे!

तुम्ही पूर्ण चेकअप केले. रिझल्ट ओके.

उत्तम. गूड न्युज! डॉक्टर म्हणतात.

रात्री जिवंतपणाच्या, उत्तम शरीराच्या आनंदात झोपी जाता. आधी मस्त जेवण घेतलेले. छातीत जोरदार कळ.. आणि मॅसिव्ह हार्ट ॲटॅक. सगळे संपले..

छे! छे! मृत्यू चूकच आहे.

व्यक्ती म्हणते, ‘‘मी धर्मासाठी मरायला तयार आहे.’’

व्यक्ती म्हणते, ‘‘मी विचारसरणीसाठी मरायला तयार आहे.’’

व्यक्ती म्हणते, ‘‘मी राष्ट्रासाठी मरायला तयार आहे.’’

मृत्यू म्हणतो, ‘‘माझ्या इतके सतत दक्ष सृष्टीत कुणीच नाही. पृथ्वीवर असंख्य सजीव नाहीत, तरी इतके महामहासंख्य पृथ्वीवर आहेत, मोजणे अशक्य. तरी मोजा! अब्जावधी सजीव एका क्षणी पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी शेवटची घटका मोजत असतात. मला सर्व ठिकाणी योग्य क्षणी अचूकपणी हजर राहायचे असते. मी अहोक्षणी ‘बिझी’ असतो. मला कधीच विश्रांती नसते. प्रत्येक सजीवाला मी भेटायचे नियम असतात, माझं वेळापत्रक असते. मी कर्तव्यदक्ष असतो... खरे तर.. व्यक्तींनी गोंधळ घातलाय. माझं काम व्यक्ती करताहेत. माझा हक्क व्यक्तींनी हिरावून घेतलाय.’’

आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘सृष्टी, विश्व, कला, तत्त्वज्ञान... ह्यात व्यक्तीला सर्जनशीलता साधलीय. पृथ्वीवरच्या सर्व व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा मिळेल अशी व्यवस्था निर्माण करायची. सर्जनशीलता व्यक्तीला साधलेली नाहीय अजून आणि गुन्हे, गुन्हेगारी, गुन्हेगार, युद्धे ह्यांचे काय करायचे? ही सर्जनशीलता व्यक्तीला नाहीच साधलेली.. ही कसली सभ्यता? सभ्यताच अजून निर्माण झालेली नाही. मी कुठून जन्माला येणार?’’

संस्कृती म्हणाली, ‘‘सभ्यता, असू दे, नाही तर नसू दे.. प्रत्येक कालखंडात झोपउड स्थितीतल्या व्यक्ती असतात, आहेत. झोपउड झालेल्या व्यक्ती शोधत असतात. काही व्यक्ती मूलभूत शोध लावतात, लावताहेत. मी निर्माण होतेय. शोध घेणाऱ्या, शोध लावणाऱ्या व्यक्ती मला प्रिय आहेत. मला सभ्यतांची फिकीर नाही. शोध घेणाऱ्यांची, शोध लावणाऱ्यांची मला खूप खूप फिकीर आहे.’’

***

आहाहा!

आदर्श सभ्यता म्हणाली, ‘‘सर्व सजीवांत माणूस श्रेष्ठ आहे, असे एक प्रमेय आहे. म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरची सर्व सर्व माणसे श्रेष्ठ... असे..!’’

नाही! असे नाही!!

काही माणसे श्रेष्ठ आणि बाकीची... बिनश्रेष्ठ.

काही माणसे बुद्धिमान. बाकीची कमी बुद्धीची.

बुद्धिमान माणसांनी शोध लावायचे. बाकीच्यांनी स्वीकारायचे असे आहे. पृथ्वीच्या पाठीवरची सर्व सर्व माणसे शोध लावण्यात सामील होतील... तेव्हा मी जन्मेन.

संस्कृती म्हणाली, ‘‘सर्वच्या सर्व माणसे शोध लावण्यात सामील! आहाहा!’’

(समाप्त)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.