मुंबई - पुष्परथामध्ये विराजमान संत आणि श्रीगुरूंच्या पादुकांची ढोलपथक आणि टाळ-मृदंगाच्या निनादात निघालेली मिरवणूक, चिन्मय मिशनचे आंतरराष्ट्रीय प्रमुख स्वामी स्वरूपानंद, आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी संत, सद्गुरू, महात्म्यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याबाबत केलेले प्रतिपादन, दर्शन मंडपातील २१ संत आणि सद्गुरूंच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये असलेला भक्तिमय उत्साह, वेगवेगळी भजनी मंडळे व गायकांनी आळवलेले संतांचे अभंग, बालवारकऱ्यांच्या पखवाज व टाळांच्या ठेक्यातील हरिनामस्मरण, सायंकाळच्या सत्रात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी सादर केलेली अभंग सेवा आणि संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांनी सादर केलेल्या ‘ओंकार साधने’ने एका वेगळ्या आध्यात्मिक विश्वाची अनुभूती सर्वांना आली.
निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘भक्ती-शक्ती व्यासपीठ’ आणि ‘एपी ग्लोबाले’ यांनी वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाचे... २१ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन कृतकृत्य झालेल्या भाविकांनी ‘सुख अनुपम संतांचे चरणी’, अशी भावना व्यक्त केली.
वरळीच्या नॅशनल एनएससीआय डोममध्ये आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाची लोकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती. हजारो लोकांनी आधीपासूनच ऑनलाइन नावनोंदणी करून ठेवली होती. शुक्रवारी दुपारीच संत-सद्गुरूंच्या पादुकांचे आगमन झाले. शनिवारी सकाळी सर्व पादुकांचा अभिषेक, पूजा आणि काकड आरती करण्यात आली.
Paduka Darshan Sohala
त्यानंतर खास फुलांनी सजवलेल्या रथातून सर्व संत व सद्गुरूंच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. वारकऱ्यांच्या हातातील भगव्या पताका, टाळ-मृदंग आणि मुखात ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरामुळे वातावरणात एक वेगळाच जोम आला. मिरवणूक डोममध्ये परत आल्यावर पारंपरिक वाद्यांच्या सुरात आणि मोठ्या भक्तिभावात पादुकांचे स्वागत करण्यात आले.
मंदिरांच्या विश्वस्तांनी पादुका डोक्यावर धरून आणल्या होत्या. त्यांना पाहून उपस्थित भाविकांचे हातही नकळत जोडले जात होते. आळंदी येथील कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी काकड आरती, दिंडी प्रदक्षिणा, हरिपाठ सादरीकरण केले.
डोममध्ये उभारलेल्या सुबक गाभाऱ्यांमध्ये पादुकांची स्थापना झाल्यावर स्वामी चिन्मयानंद मिशनचे आंतरराष्ट्रीय प्रमुख स्वामी स्वरूपानंद, आध्यात्मिक गुरू श्री एम आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या उपस्थित सोहळ्याचे उद्घाटन झाले.
त्यानंतर मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांची पादुका दर्शनासाठी गर्दी झाली होती. एकीकडे दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू असताना, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा अखंड जयघोष सुरू होता. दुपारनंतर शाळकरी मुले, भजनी मंडळांनी विविध भक्तिगीते सादर करून उपस्थितांना तल्लीन केले.
पादुका दर्शनानिमित्त कार्यक्रमस्थळी भाविकांच्या सोयीसाठी अनेक सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पार्किंग, चप्पल स्टॅण्ड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व वैद्यकीय कक्ष उभारण्यात आला आहे. प्रसाद व्यवस्थेचे भाविकांनी विशेष कौतुक केले. ध्यानधारणा कक्षात अनेकांनी ध्यान केले. याशिवाय विविध स्टॉल्सलाही उपस्थितांनी भेटी दिल्या.
विद्यार्थ्यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण
दादर येथील सानेगुरुजी इंग्रजी शाळेतील जवळपास ४० विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल नामाचा गजर’, ‘आईसारखे दैवत’, ‘स्वामी समर्थ’, ‘दत्ताचे गीत’ भक्तिगीते सादर केली. कार्यक्रमाची सांगता ‘पसायदाना’ने करण्यात आली. त्यानंतर शारदाश्रम मराठी शाळा आणि एसव्हीएम इंटरनॅशनल विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल... विठ्ठल’, ‘देह देवाचे मंदिर’, ‘पांडुरंग... पांडुरंग...’ या गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विष्णू-महालक्ष्मी स्तोत्रही अखंडपणे सुरू होते.
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उद््घाटन सोहळ्यानंतर दिवसभर भाविकांचा ओघ सुरूच राहिला. सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, अधिकारी, साहित्यिक आणि आध्यात्मिक गुरूंपर्यंत सर्वांनीच या उत्सवात हजेरी लावली. यामध्ये मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस अधिकारी, लेखक आणि आध्यात्मिक संस्थांचे प्रमुख यांचा समावेश होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संतांच्या पादुकांचे दर्शन घेतल्याचे समाधान आणि भक्तीचा भाव स्पष्टपणे दिसत होता.
‘ओंकार साधने’तून आध्यात्मिक विश्वाची अनुभूती
पादुका दर्शन सोहळ्यात उपस्थित भाविकांसाठी शनिवारची संध्याकाळ अविस्मरणीय ठरली. संतुलन आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांनी सादर केलेल्या ‘ओंकार साधने’ने एका वेगळ्या आध्यात्मिक विश्वाची अनुभूती सर्वांना आली. हार्मोनियम व बासरीच्या साथीने भजनाद्वारे वातावरणनिर्मिती करत सुनील तांबे यांनी उपस्थितांना ध्यानावस्थेत नेले.
त्यांच्याबरोबर ओंकार म्हणत सर्वांनी ‘ओंकार साधने’त प्रत्यक्ष सहभाग घेतला. ओंकाराचे वेगवेगळ्या प्रकारे उच्चारण कसे करायचे व त्याचा कसा लाभ होतो, याबाबत तांबे यांनी सविस्तर विवेचन केले. ‘ओंकार साधना’ सर्वांत सोपी आणि ती करण्यासाठी वयासह कसलीच बंधने नाहीत. या साधनेतून आयुष्य बदलल्याचे तुम्हाला अनुभवायला मिळेल.
कार्यक्षमता वाढविण्यासाठी व आक्रमकता कमी करण्यासाठी ‘ओंकार साधना’ उपयुक्त असल्याचे सुनील तांबे यांनी सांगितले. संस्कृत व भगवद्गीतेतील विविध श्लोकांचे पठन करत तांबे यांनी ‘ओंकार साधना’ सत्राची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर नीरदा यांनी, तर बासरीवर विजय तांबे यांनी साथ केली.
विराज जोशी यांच्या सुरेल मैफलीने वाढवली रंगत
रभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या परंपरेचा वारसा जपणारे त्यांचे नातू विराज जोशी यांनी पादुका दर्शन सोहळ्यात आपल्या सुरेल गायनाने शनिवारी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आजोबांनी अजरामर केलेल्या अनेक भक्तिरचना सादर करत वातावरणात भक्तिरसाची उधळण केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या पादुका दर्शन सोहळ्याची रंगत विराज जोशी यांच्या सादरीकरणामुळे आणखीनच वाढली.
संगीत व भक्तिचा अनोखा संगम भाविकांना अनुभवायला मिळाला. ‘नामाचा गजर गर्जे भीमा तीर’ या रचनेच्या सादरीकरणाने सुरू झालेली भक्तीसंध्या ‘आता कोठे धावे मन’ या अभंगाने पुढे गेली व ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या कन्नड रचनेने उपस्थितांना ठेका धरायला लावला. या रचनेतून विराज जोशी यांची तालीम व तयारी दिसून आली.
भीमसेनजींच्या प्रत्येक मैफिलीत या रचनेची मागणी प्रेक्षकांतून व्हायची. आजही उपस्थितांनी विराज जोशी यांच्याकडून ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ गाण्याची मागणी केली व नंतर पादुका दर्शन सोहळ्यात जे सूर बरसले ते ऐकून उपस्थितांना अलौकिक स्वरयात्रेचे दर्शन घडले.
त्यानंतर ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगाने विराज जोशी यांनी उपस्थितांना भीमसेनजींची आठवण करून दिली. त्यांना हार्मोनियमवर अविनाश दिघे यांनी तर तबल्यावर पांडुरंग पवार यांनी आणि टाळ व चिपळ्यांवर अपूर्व द्रविड यांनी साथसंगत केली. या वेळी विराज जोशी यांचे आई-वडील श्रीनिवास जोशी व शिल्पा जोशी उपस्थित होते.