खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर
esakal March 22, 2026 03:45 PM

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. अटकेनंतर अशोक खरातची एसआयटी चौकशी करण्यात आली. यावेळी अशोक खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांना समोरासमोर बसवून चौकशी झाली. या चौकशीवेळी दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचंही समोर आलंय. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाची एन्ट्री झाली आहे. SIT तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार आहे. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार आहे.

आयकर विभागाकडून अशोक खरातच्या उत्पन्नाचे स्त्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार आहे. याशिवाय अशोक खरातच्या संपर्कातील लोक, देणगीदार, संस्था-उद्योगातील भागिदार आणि आर्थिक मदत करणारेसुद्धा आयकरच्या रडारवर आहेत. अशोक खरातने केलेल्या मोठ्या व्यवहारांचे लिंकिंग करून संयुक्त तपास करण्यात येणार आहे.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

५२ सातबारांवर खरातचं नाव

अशोक खरातचे बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची चौकशी केली जाणार आहे. त्याने कुंडली पाहण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांवरही तपास होणार आहे. या तपासात खरातच्या आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ५२ सातबारांवर खरातचे नाव असून अनेक ठिकाणी संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत. काही सामायिक सातबाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे.

नीरजकडे ४० महिलांचे नंबर

खरातच्या बड्या भक्तांच्या शोधासाठी सीडीआर तपासला जाणार आहे. गृह विभागाची पूर्वपरवानगी घेऊन SITकडून सीडीआर तपासणी करण्यात येणार असल्याचं समोर आलंय. कॅप्टन खरातची ३ दिवसात २० तास चौकशी झाली असून खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवच्या चौकशीत ४० महिलांचे नंबर पोलिसांना मिळाल्याची माहिती आहे.

पुणे-मुंबईतील भागिदारांची चौकशी

अशोक खरात आणि नीरज जाधव यांच्याशिवाय आणखी दोघांची एसआयटी चौकशी होणार आहे. यात मुंबईत भायखळ्यातील परब आणि पुण्यातला जासूद या दोघांचा समावेश आहे. दोघेही खरातचे व्यावसायिक भागिदार आहेत. तसेच नीरजकडून आणखी काही लँड एजंटचे नंबर हस्तगत करण्यात आलेत.

कोठडीत बसून ड्युटीवर असलेल्यांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न

पोलीस कोठडीत आणि चौकशीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अशोक खरातकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बंदोबस्तावर तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांचं भूतकाळ, भविष्य सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तो करतोय. पण पोलिसांनी खाक्या दाखवत कायद्यापुढे कुणी मोठा नसल्याचं सांगण्यात आल्याचंही समजते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.