Ashok Kharat: नाशिकमध्ये (Nashik Crime News) गाजत असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासात आता मोठी घडामोड समोर आली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीचे ठिकाण अचानक बदलत खरातला अज्ञातस्थळी हलवले असून, या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता आणि खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखा कार्यालय आणि पोलीस क्लब येथे सुरू असलेली चौकशी आता नव्या ठिकाणी हलवण्यात आली आहे. या चौकशीला एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते (Tejaswini Satpute) स्वतः उपस्थित राहून तपासावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. कालच खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली होती, तर आजही त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते.
या दरम्यान, तपासाचा विस्तार करत SIT ने आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. खरातच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिरातील पुजारी आणि काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी आणण्यात आले आहे. या चौकशीमधून मंदिर आणि खरातच्या फार्महाऊसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या, याचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात आधीच मोठे धागेदोरे समोर आले आहेत. खरात आणि त्याचा निकटवर्तीय नीरज जाधव यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली असता, दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती आहे. तसेच, नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासात 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळले असून, नीरज जाधव हा फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय असताना सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या तो संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.
याशिवाय, अशोक खरात प्रकरणात आता आयकर विभागाचीही एन्ट्री झाली असून, त्याच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाचे स्रोत यांची सखोल चौकशी सुरू होणार आहे. देणगीदार, भागीदार आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात येणार असल्याने, या प्रकरणातून मोठा आर्थिक घोटाळाही समोर येण्याची शक्यता आहे. एकूणच, SIT कडून सुरू असलेल्या या बहुआयामी तपासामुळे अशोक खरात प्रकरणाचा उलगडा अधिक वेगाने होत असून, येत्या काळात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आणखी वाचा