अग्रलेख : युद्धाचे कृष्णविवर
esakal March 23, 2026 08:45 AM

युद्ध म्हणजे केवळ मुत्सद्देगिरीचेच नव्हे तर एकूण मानवी बुद्धीचेच अपयश, असे तत्त्वज्ञांना वाटते. बहुतांश वेळा युद्धाची ठिणगी पडते ती असुरक्षितता, स्पर्धा आणि अविश्वासातून. युद्धाचा निर्णय सत्तादांडगे, शक्तिशाली लोक घेतात; पण परिणाम मात्र इतरांना भोगावे लागतात. सर्वसामान्यांचे जगणे अवघड होते आणि युद्धाशी संबंध नसलेल्या देशांनाही लढणाऱ्या देशांइतक्याच युद्धझळा सहन कराव्या लागतात. छोट्या संघर्षातून सुरू झालेले युद्ध हाताबाहेर जाऊन त्याची परिणती न बदलता येणाऱ्या परिणामांमध्ये कशी होते, हे पहिल्या-दुसऱ्या महायुद्धांनी दाखवून दिले आहे.तरीही माणूस त्यातून काही शिकला की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनाई यांना पहिल्याच दिवशी हवाई हल्ल्यात ठार केल्यानंतर हे युद्ध एक-दोन दिवसात झटपट संपेल, हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांचा अंदाज सपशेल चुकला आणि तीन आठवड्यांनंतरही सतत चिघळत जाणाऱ्या या युद्धाच्या वावटळीने आधी पश्चिम आशियातील सर्व देशांना आणि आता ब्रिटनसारख्या देशालाही खेचले आहे. हे युद्ध पश्चिमआशियापुरते मर्यादित न राहता दिएगो गार्सिया आणि युरोपपर्यंत पसरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा करणाऱ्या पश्चिम आशियातील या युद्धाची झळ ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेली अमेरिका वगळता जगातील सर्वच देशांना बसू लागली आहे.

अग्रलेख : युद्धाच्या पडछायेत...

आर्थिक आणि भौगोलिक अस्थैर्याव्यतिरिक्त इंधन पुरवठा खंडित झाल्यामुळे युद्धाच्या तिसऱ्याच आठवड्यात जग महागाईने होरपळून निघू लागले आहे. तेल आणि गॅसचा पुरवठा करणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नाक दाबल्याने जगाचा श्वास कोंडला जाईल हे ठाऊक असलेला इराण आपल्याला शह देण्यासाठी गनिमी काव्याचा अवलंब करेल, याची अमेरिका आणि इस्राईलने कल्पना केली नव्हती. तिथेच त्यांची झटपट सरशी साधण्याची सारी रणनीती अपयशी ठरली. अमेरिका-इस्राईल-इराणचे युद्ध जगाच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आणि तर्कहीन विद्ध्वंसाच्या अशा टप्प्यात पोहोचले आहे जिथून आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी भागीरथ प्रयत्नांचीच आवश्यकता भासणार आहे. या युद्धाने जगावर आर्थिक संकटाचे असे कृष्णविवर निर्माण केले आहे, की ज्यात युद्धाशी संबंध नसलेलेही खेचले जात आहेत.

या युद्धामुळे अंतिमतः किती हानी होईल याचा अंदाज ट्रम्प-नेतान्याहूक-खामेनेई यांच्यासकट जगातील कुठल्याही राष्ट्रप्रमुखाला आलेला नाही. पण आतापर्यंत झालेली जीवित आणि आर्थिक हानी डोळे विस्फारणारी आहे. आयातशुल्क युद्धामुळे आधीच जर्जर झालेल्या जगाच्या अर्थव्यवस्थेला या युद्धाने प्रचंड प्रमाणात पैसा, संसाधने आणि मानवी क्षमता गिळंकृत करीत अत्यंत वेगाने आणि सर्व बाजूंनी कृष्णविवरात ढकलले आहे. जगभरातील अर्थव्यवस्था आणि वित्तीय बाजारपेठा कोसळत चालल्या आहेत. युद्धाचा रोजचा खर्च तीन ते चार अब्ज डॉलरचा असून एकूण खर्च सव्वादोनशे अब्ज डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

सुमारे साठ हजार विमानउड्डाणे रद्द होऊन जगभरातील हवाई वाहतूकउद्योगाला ५३ अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. पुरवठा साखळीत व्यत्यय निर्माण होऊन जागतिक व्यापाराला उतरती कळा लागली आहे. तीन आठवड्यांत कच्च्या तेलाचे दर ४० ते ६० टक्क्यांनी वाढले आहेत, तर भारताच्या कच्च्या तेलाच्या बास्केटचा दर २८ फेब्रुवारीच्या ६९ डॉलरवरुन थेट १४६ डॉलरवर पोहोचला आहे. जगाच्या ऊर्जा इतिहासातील हा सर्वात विनाशकारी आर्थिक व्यत्यय ठरला आहे. या युद्धामुळे खतांच्या दरात ३० ते ४० टक्के वाढ होऊन अन्नधान्याच्या भाववाढीमुळे जगाची खाद्यसुरक्षा संकटात सापडली आहे.

युरोप, तैवान, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरियासारख्या कच्चे तेल आणि गॅसवर अवलंबून असलेल्या देशांच्या औद्योगिक उत्पादनांना घरघर लागली आहे. जोखीम वाढल्यामुळे थेट परकी गुंतवणूक थांबली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या विम्याचा खर्च वाढल्यामुळे जलवाहतूक परवडेनाशी झाली आहे. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धडाधड कोसळणाऱ्या जगभरातील शेअर बाजारांना आतापर्यंत साडेतीन ट्रिलियन डॉलरचा प्रचंड मोठा भुर्दंड सोसावा लागला आहे आणि हे नुकसान थांबण्याची चिन्हे नाहीत. या युद्धाने अमेरिकेच्या कर्जात सुमारे पावणेतीन ट्रिलियन डॉलरची भर पडली आहे.

जागतिक व्यापाराचा वार्षिक तोटा १.२ ट्रिलियन डॉलरवर पोहोचणार आहे, तर जगाच्या आर्थिक विकास दरात सव्वा दोन ट्रिलियन डॉलरची घट अपेक्षित आहे. भारतीय शेअर बाजारातील सर्व समभागांचे एकूण मूल्य ५.५ ट्रिलियन डॉलरवरुन जवळपास एक ट्रिलियन डॉलरने गडगडून ४.६ ट्रिलियन डॉलरवर आल्यामुळे म्युचुअल फंड कंपन्यांच्या माध्यमातून ८० लाख कोटी रुपये गुंतवणाऱ्या २७ कोटी मध्यमवर्गीयांचा जीव टांगणीला लागला आहे.

अमेरिकी रोख्यांचे उत्पन्न पाच टक्क्यांवर किंवा कच्च्या तेलाचे दर २०० डॉलरवर जातील, तेव्हाच या विनाशाला विराम मिळेल, असा अंदाज आहे. युद्धात केवळ जीवितहानीच होत नाही तर समाजमनही बदलते, असे मानले जाते. मानवी दूरदृष्टीच्या मर्यादा स्पष्ट करणाऱ्या युद्धांमध्ये संपत्तीचा असा प्रचंड प्रमाणात विनाश होत असला तरी नवे शोध आणि बदल घडून अर्थव्यवस्थांना मिळणाऱ्या कलाटणीतून त्याची कशी थोडीफार भरपाई होते, हे युद्धातून जन्मलेल्या इंटरनेट, विमानतंत्रज्ञान आणि अणुऊर्जेने दाखवून दिले आहे. पण अशा प्रकारची प्रगती घडण्यासाठी एवढा विनाश कशाला व्हायला हवा, हा प्रश्नही प्रत्येकाच्या मनात येत असेल. प्रकाश दिसेल तेव्हा दिसेल; तूर्त तरी अनेक जण युद्धाच्या कृष्णविवरात ढकलले जाताहेत, हे खरे.

या युद्धाने जगावर आर्थिक संकटाचे असे कृष्णविवर निर्माण केले आहे, की ज्यात युद्धाशी संबंध नसलेलेही खेचले जात आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.