Ashok Kharat : महिलेला दिवस गेल्याचे कळताच खरात बिथरला, ओलांडल्या सर्वच मर्यादा…नव्या माहितीने राज्यभरात खळबळ
Tv9 Marathi March 24, 2026 09:45 PM

भोंदू बाबा अशोक खरात याचे एक -एक कारनामे आता समोर येत आहेत.  हादरवणारी माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्याविरोधात एका पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण समोर आलं. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी निवेदन सादर केले, यावेळी खरातबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या प्रकरणात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

अशोक खरात प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. तांब्यातील बाटलीतून पाणी देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेवर अत्याचार केला. महिलेला दिवस गेल्याने अशोक खरातने तिला गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला. खरातच्या सांगण्यावरून धार्मिक विधीस नकार दिला तर भविष्यात तुझे बरे वाईट होईल. तुझ्या मुलांचे वाईट होईल, असं सांगून तिला धमकावण्यात आले. दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून महिलेला द्रव्य दिले. हे द्रव्य फॉरेन्सिक लॅबला देणार आहे, असं अशोक खरात याच्यावर दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सरकारवाडा पोलीस ठाण्यातच दुसारा गुन्हा दाखल झाला आहे.  नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या काळात नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नर येथे एका महिलेच्या गरोदरपणात धार्मिक विधी करण्याचे सांगून, तिच्या पोटावर हात फिरवण्यात आला, तसेच  तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे घेण्यात आले.  नकली साप आणि वाघ दाखवून भीती घालण्यात आली. महिलांना लघवी पाजून अघोरी कृत्य केलं.

तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी माहिती दिली की,  ७ ऑक्टोबर २०२४ ते १२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सकाळी ११ वाजता कॅनडा कॉर्नर येथे फिर्यादी अशोक खरातला भेटायला गेले असता तिच्या नवऱ्याला बाहेर पाठवले. तिच्या हातात काळा दगड ठेवून कानात मंत्र पुटपुटला, डोक्यावर पाठिवर हात फिरवला. तिच्या छातीवरून हात फिरवला, घाबरू नको. मी तुझं शुद्धीकरण केलं आहे. तू झालेला प्रकार दुसऱ्या कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल अशी धमकी तिला दिली, या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.