आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची लगबग जोरात सुरु आहे. स्पर्धेला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाचा थरार हा 28 मार्चपासून रंगणार आहे. सर्व 10 संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. विस्फोटक फलंदाज रिंकु सिंह याचं प्रमोशन झालं आहे. रिंकु सिंह याची कोलकाता नाईट रायडर्सच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केकेआर टीम मॅनेजमेंटकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
रिंकूचं आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळण्याचं हे आठवं वर्ष असणार आहे. रिंकूने केकेआरसाठी 2018 साली पदार्पण केलं होतं. रिंकूला 2018 मध्ये केकेआरसाठी फक्त 29 धावाच करता आल्या. रिंकूने त्यानंतर दुसऱ्या हंगामात 37 धावा जोडल्या. त्यानंतर रिंकूला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. रिंकूने 11 धावा केल्या. मात्र रिंकूने संधी कमी मिळाल्याची तक्रार केली नाही. रिंकूने संधीची वाट पाहिली आणि तोवर कठोर मेहनत घेतली. रिंकु केकेआरचा प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. तसेच विश्वासून फिनिशिरही आहे. आता रिंकु 19 व्या मोसमात उपकर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे.
रिंकूची आयपीएल कारकीर्दरिंकूने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील एकूण 51 डावांत बॅटिंग केली आहे. रिंकूने या 51 डावांत 30.52 च्या सरासरीने आणि 145 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार धावा केल्या आहेत. रिंकूने आयपीएल कारकीर्दीत एकूण 4 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रिंकूच्या नावावर आयपीएलमध्ये 56 षटकारांची नोंद आहे. तसेच रिंकूने 87 चौकारही लगावले आहेत.
आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी केकेआर टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), मनीष पांडे, रोव्हमन पॉवेल, अंगकृष रघुवंशी, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, हर्षित राणा, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती, कॅमेरून ग्रीन, फिन ऍलन, मथीशा पाथीराना, कार्तिक त्यागी, राहुल त्रिपाठी, टीम सायफर्ट, तेजस्वी दहीया, सार्थक रंजन, रचीन रवींद्र, आकाश दीप, प्रशांत सोळंकी आणि दक्ष कामरा.