मिडिल ईस्ट मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळेच हैराण होतील असा दावा केला आहे. इराणने अमेरिकेला मोठं गिफ्ट दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित हे गिफ्ट आहे. त्यांनी या गिफ्टबद्दल पूर्ण माहिती दिलेली नाही. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली. “इराणने आम्हाला एक गिफ्ट दिलय. ते आजच आमच्याकडे पोहोचलं आहे. हे गिफ्ट खूप मोठं आणि भरपूर किंमती आहे. हे अणवस्त्राशी संबंधित नाही. तेल आणि गॅसशी संबंधित आहे. त्यांनी असं करुन खूप चांगलं काम केलय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जगातील एक महत्वाचा तेल मार्ग आहे. या जलमार्गावरुन जागतिक तेलाची जवळपास 20 टक्के वाहतूक होते. त्यामुळे हॉमुर्झ मध्ये होणार्या कोणत्याही घडामोडीचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होतो.
युद्धाला सुरुवात झाल्यापासून इराणने हा तेल मार्ग रोखून धरलाय. त्यामुळे अनेक देशात तेल संकट निर्माण झालं असून अस्थिरता वाढली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये इराणने नाकाबंदी सारखी स्थिती करुन ठेवली आहे. अनेक देशांच्या जहाजांना लक्ष्य केलय. त्यामुळे तेल आणि गॅस भरलेली हजारो जहाजं समुद्रात अडकून पडली आहेत. जगभरात तेल आणि गॅसची टंचाई वाढू लागली आहे. जगात तेल आणि गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
इराण सोबतच्या डीलवर ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सुरु असल्याचा ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला. “इराण आता काही समजुतीच्या गोष्टी करतोय. तह करण्यासाठी तयार आहे. आमची अजूनही चर्चा सुरु आहे. इराणला सुद्धा डील हवी आहे. अमेरिकी अधिकारी तेहरानमधील योग्य लोकांच्या संपर्कात आहेत” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
कोणते नेते चर्चेचा भाग?
“जेडी वेन्स आणि मार्को रुबियो सारखे मोठे नेते या चर्चेचा भाग आहेत. इराणला आता हे युद्ध संपवायचं असून ते एक मोठा करार करण्याच्या जवळ आहेत” असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अमेरिकी प्रतिनिधी या आठवड्यात काही चर्चा करणार आहेत की नाही हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.
ट्रम्प यांच्या जवळचा माणूस निराश
“अणवस्त्र बनवणार नाही हे इराणने मान्य केलय. तुम्ही अणवस्त्र बाळागायची नाही हे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलय आणि ते तयार आहेत” असा दावा ट्रम्प यांनी केला. “हे अभियान इतक्या लवकर कसं संपलं? त्यामुळे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ निराश आहेत. हा विषय इतक्या लवकर संपावा अशी त्यांची इच्छा नव्हती” असं ट्रम्प म्हणाले.