एम बी चितळे कन्स्ट्रक्शन्सचे संस्थापक मुकुंदराव चितळे यांचं निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
एबीपी माझा वेब टीम March 26, 2026 01:13 AM

Mukundrao Chitale Passes Away :  एम बी चितळे कन्स्ट्रक्शन्सचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज सायंकाळी सहा वाजता पुण्यातील कोथरुड मधील राहत्या घरी त्यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बी. जी. चितळे डेअरीचे संस्थापक कै. भास्कर तथा बाबासाहेब चितळे यांचे सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनुराधा चितळे, पुत्र महेश व अच्युत, कन्या सौ. मंजिरी गद्रे, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

कडक शिस्तप्रिय अशी ओळख असलेले मुकुंदराव चितळे यांचे प्राथमिक शिक्षण भिलवडी येथे झाले. त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदविका कराड मध्ये घेतली. मुकुंदराव उत्तम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून सर्वपरिचित होते. भारती, एम. आय. टी., सिंहगड, डी वाय पाटील कॉलेज, कर्नाटक हायस्कूल यांसारख्या शिक्षणसंस्था, पुना हॉस्पिटल, जोशी व रत्ना हॉस्पीटल, प्रेसिडेंट, हॉटेल सायाजी , प्राइड हॉटेल व हॉटेल सायाजी , पारी, थरमॅक्स, पंडित ऑटोमॅटिव्ह, पॅक टाईम, इनोव्हा रबर, आय टी पार्क पुणे , तसेच मे बी. जी. चितळे डेअरी, चितळे बंधू आणि इतर अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचे उल्लेखनीय योगदान होते.

सामाजिक आणि धार्मिक कार्यातही त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चितळे डेअरीचे दूध पुण्यापर्यंत नियमितपणे पोहोचावे, यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत मोलाचा वाटा उचलला होता. सामाजिक आणि धार्मिक कार्यातही त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विंध्यवासिनी, चिपळूण मंदिराचा जीर्णोद्धार, श्री कोटेश्वर देवस्थान, लिंब-गोवे येथील सभागृह व इतर बांधकामे, तसेच वेद पाठशाळा, पुणे यांच्या उभारणीत त्यांनी आपल्या स्थापत्यज्ञानाचा, अनुभवाचा आणि व्यवस्थापनकौशल्याचा मोठा उपयोग करुन दिला. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ते रोटरी क्लब : टिळक रोड पुणेचे सक्रिय सभासद होते. त्यांच्या दुःखद निधनाने चितळे परिवार, भिलवडी व पुणे, तसेच विविध सामाजिक संस्थांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.