सह्याद्रीचा वाघ, मऱ्हाटी दौलतीचे स्वामी श्रीश्री उधोजीसाहेब यांसी, सालंकृत सौभाग्यकांक्षिणी कमळेचा सा. न. वि. वि. फारा दिसात गाठभेट नाही. जीव झुरतो. ऊर भरून येतो. असा एकही दिवस जात नाही की इकडच्यांची आठौण येत नाही. सार्ख आप्लं ‘तुम होते तो ऐसा होता, तुम होते तो वैसा होता, तुम हर इक बात पे ऐसा कहते...’ असं ‘कभी कभी’ सिनिमातल्या अमिताभ बच्चनसार्ख चालू अस्तं. पण तुम्ही बेदर्दी बालमा आहात! तुम्हाला नै कळायचं!!
तुमच्या फोटोग्राफीचे मी नेहमीच कवतिक करत आल्ये. जंगलात जाऊन वाघाचे फोटो काढणारे तुम्ही, पण माझे मात्र कधी फोटो काढले नैत. येवढी का भीती वाटली? दरवेळी मी सेल्फी घ्यायला आल्ये, तरी पळून जात होता.
गेली कितीतरी वर्स तुमची वाट पाहत्ये आहे. पण तुम्ही माझ्याकडं बघायला तयार नाही. येवढा कसा बाई आमचा राघू रुसला?
साजिश की सौगात पहनकर बैठ गए,
अनचाहे हालात पकड़कर बैठ गए,
जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था,
ना जाने क्यों बात पकड़कर बैठ गए
...काल तुमचा आमदार्कीचा शेवटचा दिवस होता. आज तुम्हाला सेंडऑफ द्यायचा म्हणून मी किती शेरोशायऱ्या धुंडाळल्या. एकही मनास येईना! शेवटी एक जबरी शेर सांपडला. अर्ज किया है-
इश्क ने गैरते जजबात ने रोने ना दिया,
वरना क्या बात थी, इस बात ने रोने ना दिया!
पण ‘गैरते जजबात’चा अर्थ नीट लागला नाही, म्हणून तो शेर क्यान्सल केला. ते जाऊ दे. आता बात पकडून बसलात तर कसं चालेल? बात सोडा, आणि बातमी द्या!!
खूप खूप शुभेच्छा.
नेहमीच तुमची. कमळाबाई.
ता. क. : पुन्हा आमदार्कीत इंटरेस असेल तर फक्त एक लाल बदामाची इमोजी पाठवा. पुढचं मी बघून घेत्ये!
………………….
कमळेऽऽऽ
तुझी हिंमत झालीच कशी आम्हाला खत लिहिण्याची!! आमच्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी तू काही तरी कुरापत करणार याची अटकळ होतीच. चार चौघांत भलतीसलती शेरोशायरी करून तू जगाला भुलवलेस, पण आम्ही असे बधणारे नाही. कमळे, आम्ही तुला चांगले ओळखून आहोत. ‘न जाने क्यों बात पकड कर बैठ गये’ असे तू शेरोशायरीत म्हणालीस. पण बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी!
आम्ही बात पकडून बसलो? असेल! कुछ तो बात रही होगी, जो हम बात पकड़कर बैठ गए!! पण बात म्हणजे काय बेस्टच्या बसमधल्या स्टँडिंग प्रवाशाच्या हातातले हँडल आहे? बाता मारू नकोस. होय, आम्ही तुला सोडले. कारण तुझी कृष्णकृत्ये आम्हाला कळली. नसत्या बाता मारणारी तू एक महाडांबिस बाई आहेस, याचा अनुभव आला म्हणून आम्ही तुझ्या पेकाटात लाथ मारली.
आता मोठ्या शेरोशायऱ्या करून आम्हाला पुन्हा भुलवू पाहात्येस. आग लागो तुझ्या शायरीला. गद्दारांना पोटाशी घेऊन तू आमच्या पाठीत खंजीर खुपसलास. खुर्चीत सहज अंग टाकायला जावे, आणि कुणीतरी खुर्चीच काढून घेतल्याने दाणकन हापटावे, तसे केलेस. कमळे, कितीही शायरी केलीस तरी तुला आता क्षमा नाही.
तुझ्याच भाषेत सांगतो, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, तुझ्या नाकावर टिच्चून पुन्हा येईन! बघशीलच तू!! उधोजी. (सिर्फ नाम काफी है!)
ता. क. : अनवधानाने लाल बदाम पाठवून लागलीच मेसेज डिलीट केला!