Chandrapur Crime News : चंद्रपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पोलीस कर्मचाऱ्याचा मुलीने विष देऊन खून (Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर तब्बल 3 वर्षांनी या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. यातील आरोपी मुलीनेच वडिलांच्या हत्येचा कट रचत विष (Crime) देऊन हत्या केली आहे. यातील मयत पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी देखील चंद्रपूर पोलीस विभागात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यातरत आहे. या घटनेनं पोलीस विभागासह चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस सध्या पुढील कारवाई करत आहे.
Chandrapur Crime News : मुलीच्या प्रेमप्रकरणाला वडिलांचा विरोध, 3 वर्षांनी अखेर सत्य आलं बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील आरोपी जावयाला पोलीस ट्रेनिंग दरम्यान सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. सोबतच मयत पोलीस कर्मचाऱ्याचा मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध होता. याच कारणातून मुलीने विष देऊन केली पित्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 25 एप्रिल 2023 ला जयंत बाल्लावार (45) यांचा ड्युटीवर असतांना जिल्हाधीकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनात चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला होता. मात्र तेव्हा मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलं नव्हतं. मात्र 3 दिवसांपूर्वी मृतकाचा जावई आशिष शेडमाके याने पोलीसात आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली देत आपली पत्नी आर्या बाल्लावार हिने वडिलांना विष देऊन मारल्याची माहिती दिली. परिणामी या हादरवणाऱ्या हत्येचा कट अखेर 3 वर्षांनी का होईना उघड झाला आहे.
Chandrapur Crime : ड्युटीवर जाण्यापूर्वी आर्याने वडिलांना मिल्कशेकमध्ये दिलं विष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत बाल्लावार यांना ड्युटीवर जाण्यापूर्वी आर्याने मिल्कशेकमध्ये विष टाकून पिण्यासाठी दिले. मिल्कशेक पिल्यावर जयंत बाल्लावार हे ड्युटीवर प्रशासकीय भवनमध्ये गेले असता त्यांचा मृत्यू झाला. 2022 पासून प्रेमसंबंधात असलेल्या आर्या आणि आशिष यांच्या प्रेमाला जयंत बाल्लावार यांचा विरोध होता. त्यामुळे आर्याने आपला मावसभाऊ चैतन्य गेडाम (22) याच्याकडून 2 हजार रुपयांना विष विकत घेतले.
Chandrapur Crime : वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांनी लग्न केलं, मात्र संसारात वाद विकोपाला गेला अन्....
दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांनी लग्न केलं. मात्र लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले, त्यातच बेशिस्त वर्तनामुळे आशिष शेडमाकेला ट्रेनिंग दरम्यान पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं, तर ट्रेनिंगनंतर आर्या बाल्लावार सासरी न येता माहेरी गेल्याने संतापलेल्या आशिष शेडमाकेने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी महिला पोलीस अंमलदार आर्या बाल्लावारसह आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम आणि विष विकत देणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या