Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष
esakal March 27, 2026 02:45 PM
Delhi Live : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील ही कपात सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून ३ रुपयांपर्यंत आणि डिझेलवरील शुल्क १० रुपयांवरून शून्यावर आणल्याच्या संदर्भात, टीएमसीच्या खासदार सागरिका घोष म्हणाल्या की, उत्पादन शुल्कातील ही कपात सरकारच्या अपयशाचे निदर्शक आहे.

Kolhapur Live : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर परिसरात भाविकांवर पुजाऱ्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेनंतर वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणात संबंधित पुजाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मंदिरातील मक्तेदारी संपुष्टात आणावी आणि कायमस्वरूपी शासकीय पुजाऱ्यांची नेमणूक करावी, या प्रमुख मागण्यांसाठी परिते ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुजारी हटाव, जोतिबा बचाव या घोषणेखाली येत्या सोमवारी दि ३० मार्च रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर न्याय मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात परिते गावासह जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच विजय पाटील यांनी दिली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Live : छत्रपती संभाजी नगरमधील पेट्रोल-डिझेलसाठी पुन्हा उसळली गर्दी, रिक्षाचालक आक्रमक

आज सकाळपासून पुन्हा छत्रपती संभाजी नगरमधील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शहरासह ग्रामीण भागातही इंधनासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच रिक्षांसाठी लागणारे गॅस उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांमध्ये नाराजी वाढून ते आक्रमक झाले आहेत. पैठण रोड आणि जालना रोडवर रस्त्याच्या कडेला रिक्षा उभ्या केल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून इंधन पुरेसा असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गर्दी काही कमी होत नसल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे आणि पेट्रोल पंप चालकांनाही या परिस्थितीचा सामना करताना अडचणी येत आहेत.

Kolhapur Live : हुपरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, हरवलेले १०० मोबाईल नागरिकांना परत

कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी करत हरवलेले तब्बल १०० मोबाईल संच नागरिकांना परत दिले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २९ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित मोबाईलचे क्रमांक एकत्रित केले आणि त्याआधारे शोधमोहीम राबवली. या मोहिमेमुळे हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात यश आले आणि ते त्यांच्या मालकांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून आला असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Car Accident : शाळकरी मुलींना मोटारीने उडविले; मेखळी येथे अपघात

रायबाग : दारूच्या नशेत बेदरकार मोटारचालकाने पायी चालत जात असलेल्या दोन शाळकरी मुलींना (Raibag Drunk Driving Accident Kills Schoolgirl) उडविले. या अपघातात दहा वर्षीय मुलगी ठार झाली, तर पंधरा वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. रायबाग तालुक्यातील मेखळी येथे हा अपघात झाला. जयश्री विठ्ठल कोट्रे (वय १०) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर भाग्यश्री विठ्ठल कोट्रे (वय १५) ही जखमी झाली आहे. श्रीशैल परगौडा पाटील (रा. चिंचली, ता. रायबाग) असे मोटारचालकाचे नाव आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरातची करण्यात आली एचआयव्ही टेस्ट

- अशोक खरातची झाली एचआयव्ही टेस्ट

- नाशिक पोलिसांनी केली एचआयव्ही टेस्ट

- भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अशोक खरात करत होता महिलांवर अत्याचार

- अशोक खरात याची एचआयव्ही टेस्ट आली निगेटिव्ह

- पोलिस कोठडीत करण्यात आली टेस्ट

Nashik News : भोंदू अशोक खरात आता ED, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर

- कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे ED कडे पाठवण्याची तयारी

- विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार

- २१ देशांतील दौऱ्यांचा खर्च, फॉरेक्स अँगल तपासात

- तुर्कस्थानसह विदेशातून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का? चौकशी सुरू

- भोंदू अशोक खरात आता ED, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर - कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे ED कडे पाठवण्याची तयारी - विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार - २१ देशांतील दौऱ्यांचा खर्च, फॉरेक्स अँगल तपासात - तुर्कस्थानसह विदेशातून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी भरली का? चौकशी सुरूBelgaum News : सीमाप्रश्नी लवकर सुनीवणीसाठी सह्यांच्या मोहिमेबाबत बैठक

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या दीर्घकाळ प्रलंबित मुद्द्यावर पुन्हा एकदा हालचालींना वेग देण्यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषकांची बैठक आयोजित केली आहे. सुनीवणी लवकर घेण्याबाबत सीमाभागातील मराठी भाषकांच्या एक लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, या मोहिमेचा प्रारंभ या बैठकीतून केला जाणार आहे.

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; सोमवारपासून जोर वाढणार

नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, सोमवारपासून या पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. दरम्यान, कोकण भागात आज उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होण्याचे संकेत आहेत. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला असून, विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Lord Mahavir Jayanti : भगवान महावीर जयंतीची सुटी आता सोमवारी

बेळगाव : यंदा भगवान महावीर जयंतीच्या सुटीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी (ता. ३०) जयंतीची सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याआधी मंगळवारी (ता. ३१) भगवान महावीर जयंतीची सरकारी सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यात बदल करण्यात आला आहे. यामुळे सुटीबाबतची संभ्रमावस्था दूर झाली आहे.

Iran Declaration : भारतासह मित्रदेशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली; इराणकडून घोषणा

तेहरान/नवी दिल्ली : ‘‘इराणने भारतासह चीन, रशिया, इराक, पाकिस्तान या मित्र देशांना व्यावसायिक जहाज वाहतुकीसाठी होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे,’’ अशी घोषणा इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी गुरुवारी केली.

Dr. Jaysingrao Pawar Passed Away : ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन; कोल्हापुरात आज नऊ वाजता होणार रक्षाविसर्जन

Latest Marathi Live Updates 27 March 2026 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार जगभर रुजविणारे, समाजवादी व बहुजनवादी विचारांचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ इतिहास संशोधक, मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक व विचारवंत प्रा. डॉ. जयसिंगराव पवार (वय ८५) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संशोधन आणि ज्ञानाच्या प्रकाशाने महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्य पैलू उजळून टाकणारा आणि समाजाला वैचारिक दिशा देणारा प्रकाशाचा अखंड दीप शांत झाला. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अठ्ठेचाळीस दिवस उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांचे निधन झाले. कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी वसुधा, मुली अरुंधती व मंजुश्री, मुलगा पृथ्वीराज, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज (ता. २७) सकाळी नऊ वाजता होणार आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.