उजनी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर! शेतीसाठी २५ मेपर्यंत पाणी; भीमा नदीत पाणी सोडण्याचा नाही निर्णय, धरण ५० टक्के, वाचा...
esakal March 28, 2026 01:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण १ जानेवारीला १०० टक्के भरले होते. मात्र २७ मार्च रोजी धरणातील पाणीसाठा सुमारे ५० टक्क्यांवर आला आहे. १७ मार्चपासून उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी २० ते २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

गतवर्षी ६ मार्चपासून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी धरणात एकूण ८८.३० टीएमसी (२४.६० टीएमसी उपयुक्त साठा) पाणीसाठा होता. सध्या २७ मार्चअखेर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टीएमसी पाणी अधिक आहे. मागील वर्षी १८ एप्रिल रोजी उजनी धरण उणे पातळीत पोहोचले होते; मात्र यंदा मे अखेरपर्यंत धरण उपयुक्त साठ्यातच राहील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सध्या उजनीतून शेतीसाठी कालव्याद्वारे २५७० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे.

तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी ३१५ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ९० क्युसेक आणि बोगद्यातून ९०० क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी सोडलेले पाणी पिकांसाठी मोठा आधार ठरत असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या उजनी धरणातील पाणी थेट सुमारे दीड लाख हेक्टर (पावणेचार लाख एकर) क्षेत्राला पोहोचत आहे. ‘टेल टू हेड’ पद्धतीने शेतीसाठी सोडलेले पाणी पुढील ५० ते ५५ दिवस सुरू राहणार आहे.

उजनीची सद्यःस्थिती

  • एकूण पाणीसाठा : ९०.३० टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा : २६.८० टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी : ४९.८२ टक्के

  • शेतीसाठी सोडलेले पाणी : ३८०५ क्युसेक

भीमेत पाणी सोडण्याचा निर्णय अद्याप नाही

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्याने यंदा भीमा नदीतून दर दोन-अडीच महिन्यांनी पाणी सोडण्याची गरज भासली नाही. मात्र, भीमा नदीकाठावरील शेती, जनावरे व गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी नदीतून पाणी सोडणे आवश्यक असते. सुमारे महिनाभरापूर्वी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. पुढील काळात पाणी कधी सोडायचे, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.