मागच्या आठवड्यात रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नाव आल्यामुळे त्यांना आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशोक खरातवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. भोंदूगिरीच्या आडून त्याने महिलांचं लैंगिक शोषण चालवलं होतं. महिलांवर तो अत्याचार करायचा. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अशोक खरातला पाठीशी घातल्याचा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप होत आहे. अशोक खरातसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचेही दावा केला जात आहे.
काल रुपाली ठोंबरे पाटील आणि सुष्मा अंधारे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी रुपाली चाकणकर यांना अटक करा अशी मागणी केली. रुपाली चाकणकर हे रॅकेट चालवत होत्या का? या प्रश्नावर रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, ‘जे पुरावे समोर आलेत त्यानुसार रुपाली चाकणकर चालवत आहेत हे प्रथमदर्शनी दिसत आहे’ ‘रुपाली चाकणकर यांची अजूनपर्यंत का चौकशी झाली नाही?’ असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला. दर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची साप्ताहिक बैठक होते. त्यात सुद्धा पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी, आमदारांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली होती. कारण रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाला डाग लागतोय, पक्षाची प्रतिमा मलिन होतेय असं त्यांचं म्हणणं होतं.
रोहिणी खडसे यांचे जिव्हारी लागणारे शब्द
आता या विषयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी कुठेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे. ‘वैयक्तिक’कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला…’ एवढीच त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
‘वैयक्तिक’ कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला… #Maharashtra #Politics
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse)
रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्टमध्ये काय म्हटलय?
काल रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या राजीनाम्यात ‘मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा’ एवढचं म्हटलं होतं. पण एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये रुपाली चाकणकर यांनी, खरातच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच असं म्हटलं आहे.