शरीरसुखाची मागणी धुडकावताच अभिनेत्याने मोलकरणीला संपवलं; दारातच बॉडी दिसली अन्.. मिरारोड हादरलं
abp majha web team March 28, 2026 03:43 PM

Mumbai crime: मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड परिसरात एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीची  हत्या केल्याचं समोर येत आहे. महिलेचा खून करून आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. शरीरसुखाची मागणी महिलेने नाकारल्यामुळे आशिषने तिचा जीव घेतलाच प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आशिष मेश्राम (Ashish Meshram) हा टीव्ही अभिनेता असून काही नावाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. या प्रकरणाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित मृत महिलेच्या पश्चात तिचा पती आणि चार मुलं असा परिवार आहे. तिचा पती चप्पल दुरुस्तीचे काम करतो, तर मोठा मुलगा खाजगी कंपनीत कामाला आहे. आठ नऊ घरांमध्ये घरकाम करून ती महिला कुटुंबाला हातभार लावायची . गेल्या तीन वर्षांपासून ती अभिनेता आशिष मेश्रामच्या घरी काम करायची.

नेमकं प्रकरण काय? 

काशिमिरा या भागात वास्तव्यास असलेली मृत महिला सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड इमारतीत काही दिवसांपासून घरकाम करत होती. बुधवारी सायंकाळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजात गंभीर जखमी अवस्थेत महिला दिसली. शेजारी राहणाऱ्या महिलेला हे दिसून आलं. तिने आजूबाजूच्या इतर नागरिकांना बोलवून महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखलही केलं, मात्र तिचा मृत्यू झालेला होता. महिलेच्या गळ्यावर छातीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याचं आढळून आलं. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर आरोपीने पळ काढला. मीरा रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिनेता सोसायटीमध्ये शिरताना आणि तिथून बाहेर पडताना अत्यंत घाईत असल्याचे दिसून आलं. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढत त्याला विशाखापट्टणम येथून अटक केल्याचा समोर आलं आहे. 

अभिनेत्याने मोलकरणीचा काटा काढला

या प्रकरणाचा उलगडा करताना पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता आशिष महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करत होता. महिलेने वारंवार ही मागणी धुडकावून लावल्यानंतरही अभिनेत्याने वारंवार तिचा छळ केला. जानेवारी महिन्यात आरोपी आशिषने महिलेच्या मुलाला फोन करून धमकी दिलेली. 'तुझ्या आईने माझ्याकडे काम करणं बंद केलं किंवा माझ्या मागण्या मान्य केला नाही तर तिला जीवे मारीन ' अशी धमकी दिल्यानंतर महिलेच्या मुलाने आशिषला गाठून मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आशिषच्या मोठ्या भावाने महिलेला विश्वासात घेऊन 'आशिष आता फ्लॅटवर राहत नाही', असे सांगितले. पुन्हा एकदा महिलेने विश्वास ठेवून त्या घरात कामाला जाण्यास सुरुवात केली होती. कामावर आल्याचे पाहून आरोपींना घरात प्रवेश केला आणि महिलेचा काटा काढल्याचं समोर आलं .

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.