आशिष तागडे- ashish.tagade@esakal.com
सनातन हिंदू संस्कृतीत मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिरांचे बांधकाम, त्यासाठी वापरलेली पद्धती याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात कायमच कमालीचे कुतूहल असते. भारतातील मंदिरांचे स्थापत्यशास्त्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये काळानुरूप बदल होत गेले असले, तरी शैली मात्र कायम राहिली आहे. ती शैली पाहताना कोणताही सामान्य माणूस हरखून जातो. मंदिरांच्या निर्मितीचा विचार करत असताना पर्यावरणाचाही विचार केलेला दिसतो. मंदिर, मंदिरशास्त्र, त्याच्या स्थापत्याची कल्पना, आराखडा आणि बांधणी याचा अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतलेला शोध म्हणजे ‘हिंदू मंदिर कोश’ हा ग्रंथ! प्रदीप म्हैसकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ही पुस्तकात मांडणी केली आहे.
मुळात भारतात मंदिर बांधणीची सुरुवात कधी आणि कशी झाली, यावर सविस्तर चर्चा या कोशामध्ये करण्यात आली आहे. भारतात प्रामुख्याने नागर, द्रवीड आणि वेसर असे मंदिरांचे तीन प्रकार आहेत. म्हणजे, उत्तर भारतात, दक्षिण भारतात आणि मध्य भारतात वेगवेगळे प्रकार असल्याचे ढोबळमानाने मानले जाते. परंतु, हीच परंपरा कायम आहे, असे मात्र नाही. भारतीय वैदिक परंपरेत मंदिरनिर्माणाचे, तसेच स्थानमाहात्म्य महत्त्वाचे होते. मंदिर कोठे निर्माण करावे, त्यासाठी कोणते स्थान उपयुक्त आहे, याचा पूर्ण अभ्यास पुरातन काळात मंदिर निर्माण करताना केला जायचा. कारण, ज्या देवतेचे मंदिर उभारायचे आहे, त्या देवतेला ते स्थान अनुकूल असणे आवश्यक आहे. त्याबाबतचे निकष काय होते, याचा आढावा या कोशामध्ये घेण्यात आला आहे.
मंदिर म्हणजे देवालय अर्थात देवाचे निवासस्थान. त्यामुळे ते निर्माण करताना काही संकेत पाळणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी नेमके कोणते संकेत पाळणे आवश्यक आहे, याची सविस्तर माहिती या कोशात दिली आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मंदिरांची रचना कशी असते याबाबत देण्यात आलेली माहिती या विषयातील अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी व विद्यार्थ्यांसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. मंदिराचे भाग कोणते, त्या घटकांना काय म्हणतात, याची सविस्तर मांडणी केलेली आहे. मंदिराचे उपपीठ, अधिष्ठान, वेदिबंध, मंडोवर, स्तंभ, गवाक्ष, सुरसुंदरी, द्वार, द्वारशाखा, तोरण, मुखमंडप, मंडप, वितान, अंतराल, गर्भगृह, प्रपाल, नासिका, शिखर, कलश, ध्वज, सोपान आणि विमान असे भाग आहेत. या सर्वांची माहिती या कोशात सविस्तरपणे दिलेली आहे.
भारतात अनेक ठिकाणे केवळ मंदिरासाठी ओळखली जातात. तेथे मंदिर पाहण्यासाठी अनेक जण जातात. ही भेट ती देण्यापूर्वी या कोशाचे वाचन केल्यास मंदिर समजून घेणे अधिक सोपे होईल. मंदिर म्हणजे केवळ वास्तू नाही, तर ते देवालय आहे! त्यामुळे ते पाहताना किंवा अभ्यासताना भक्तिभावाबरोबर त्यामागच्या शास्त्राची माहिती असणेही आवश्यकच ठरते. ती माहिती या कोशात मिळते. मुळात देवतेचे निवासस्थान म्हणून आपण मंदिरांकडे पाहत असलो, तरी एक शास्त्र म्हणून तो निश्चितच अभ्यासाचा विषय आहे. एखाद्या मंदिरात गेलो, तिथल्या देवतेला नमस्कार केला आणि बाहेर पडलो, म्हणजे मंदिर पाहिले, अभ्यासले असे होत नाही. मंदिर पाहत असताना ते वाचायचे कसे याचे शास्त्रशुद्ध ज्ञान हा कोश वाचताना आपल्याला होते. या कोशात भारतातील बहुतांश भागातील मंदिरांची सविस्तर माहिती दिली आहेत. ती देत असताना रचनेचा नकाशाही दिलेला आहे. मंदिर निर्माण करण्यामागील दृष्टी आणि दृष्टिकोन यांचाही आढावा घेतला आहे. त्यामुळे भारतातील मंदिरांवर अभ्यास करणाऱ्या संशोधक व विद्यार्थ्यांसाठी हा कोश म्हणजे खूप महत्त्वाच्या माहितीचा संदर्भासह तपशील देणारा खजिना आहे.
पुस्तकाचे नाव : हिंदू मंदिर कोश
लेखन : प्रदीप म्हैसकर
प्रकाशक : प्रसाद प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ५४४ मूल्य : ९०० रु.