प्रभा जोशी, saptrang@esakal.com
‘इंडिया ६७’ या लघुपटाची कल्पना भारत देशातील छोटी खेडी, कसबे, गावं, शहरं आणि महानगरं इथला एक दिवस अशी आहे. या विषयाचा आवाका कुठून कुठे जातो आणि काय काय सांगू पाहतो त्याचा दृश्य अनुभव विलक्षण आहे.
एस. सुखदेव हे भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेले थोर लघुपट दिग्दर्शक. वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी मृत्यू झालेल्या एस. सुखदेव यांनी ६०पेक्षा अधिक लघुपट बनवले. त्यातले काही गाजलेले आणि महत्त्वाचे लघुपट फिल्म्स डिव्हिजनसाठी केले होते. हे लघुपट आजही कालातीत वाटतात. कॅमेऱ्याचा नेमका आणि भेदक वापर, तीक्ष्ण सामाजिक-राजकीय जाणीव, काय सांगायचं आहे याची स्पष्टता आणि निखळ सौंदर्यदृष्टी ही त्यांची काही वैशिष्ट्यं.
अँड माइल्स टू गो, इंडिया ६७, बांगलादेश युद्धावरचा नाइन मंथस् टू फ्रीडम हे त्यांचे जागतिक नोंद घेतले गेलेले महत्त्वाचे लघुपट. १९६७मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून वीस वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने एस. सुखदेव यांनी ‘इंडिया ६७’ हा लघुपट बनवला. कुठलंही निवेदन नसलेला; परंतु केवळ दृश्य, शेकडो फ्रेम्स आणि प्रसंग याची अमूर्त मांडणी करीत फार मोठा परिणाम साधणारा हा एक अविस्मरणीय लघुपट आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या दोन दशकांनंतर देशातलं चाकोरीबद्ध जीवन, प्रगतीच्या संथ खुणा, आव्हानं, उत्कट आकांक्षा आणि मोठे अंतर्विरोध याचं केवळ कॅमेऱ्याच्या माध्यमातून एस. सुखदेव यांनी दर्शन घडवलं. ही मांडणी मूक आहे. त्यामुळे यातून अर्थ आणि निष्कर्ष शोधण्याचं काम लघुपटाने प्रेक्षकांवर सोडलेलं आहे.
‘इंडिया ६७’ या लघुपटाची कल्पना भारत देशातील छोटी खेडी, कसबे, गावं, शहरं आणि महानगरं इथला एक दिवस अशी आहे. या विषयाचा आवाका कुठून कुठे जातो आणि काय काय सांगू पाहतो त्याचा दृश्य अनुभव विलक्षण आहे.
लघुपट सुरू होतो तेव्हा दूरवर पसरलेल्या वाळवंटात लांबून एक बाई पाणी घेऊन येताना दिसते. त्या वाळवंटात उघड्यावरच तिचा संसार आहे. तीन दगडांच्या चुलीसमोर बसून ती पीठ मळते, तव्यावर भाकरी टाकते. ‘एन इंडियन’ डे असं शीर्षक पडद्यावर येतं. दृश्य पुढे जातं. तिथेच बसलेलं बाईचं लहान मूल बोटं चाटून भाकरी खातं. वारा घोंगावत असतो. बाई मांडीवरच्या छोट्या बाळाला भरवते. तिची छोटी मुलगीही जेवत असते. बाजूला बकरी चरत असते. अचानक वाळूतून सरसरत साप येतो. बाई काठी घेऊन साप मारते. तेव्हा ‘फिल्म बाय एस. सुखदेव’ असं शीर्षक येतं. असे धक्का देणारे जंप कट पुढे वारंवार येतात.
तिथे उघड्या वाळवंटातच ती लहान मुलगी वाळूत झोपलेल्या तान्ह्या बाळाला जोजवते. गाणं म्हणते. तिच्या निरागस चेहऱ्यावर काही क्षण कॅमेरा रेंगाळतो. वाळूत छोटे किडे धावत असतात. कॅमेरा काही क्षण त्यांचा पाठलाग करतो. अशा अनेक क्षणांचा पाठलाग दिग्दर्शक सुखदेव पूर्ण लघुपटात करतात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या वीस वर्षांतील व्यक्त-अव्यक्त तथ्यं मोंताज रूपात समोर ठेवतात.
पहिला प्रसंग आणि दृश्य, त्या छोट्या मुलीचा गाणारा आवाज फेड आऊट होतो. वाळवंटात दूरवर एक मोठी गढी असावी अशी राजेशाही हवेली दिसते. बाहेर मोहनगढ असं नाव कोरलेलं असतं. हवेलीतील फोनची रिंग वाजते. ऑपरेटरला कुणी तरी इंग्रजीत विचारतं, ‘मे आय स्पीक विथ हिज हायनेस महाराजा ऑफ मोहनगढ?’ ‘वन मिनिट सर,’ असं म्हणून फोन प्रतीक्षेत राहतो. आधीची वाळवंटातील दृश्यं आणि मग गढी, फोन, इंग्रजीतलं संभाषण हा एकाच परिघात दिसणारा अंतर्विरोध आहे.
कॅमेरा परत दूरवर तलावाचं पाणी भरणाऱ्या ग्रामीण स्त्रियांपर्यंत पोहोचतो. ग्रामीण राजस्थानी पोशाख, नाकातील मोरणी, पायातील पैंजण, नक्षीदार जोडवी इथे काही क्षण कॅमेरा रेंगळतो आणि सोबत निर्व्याज कुतूहलाने पाहणारे काही चेहरे दिसतात. दूरच्या हवेलीत एक म्हातारा वादक कोकासदृश्य वाद्य वाजवत त्यात रंगून गेलेला आहे. त्या वाद्याचा आवाज भरून राहिला आहे. रस्त्याने उंट जातात. विजेच्या तारांवर कबुतरांची गर्दी झाली आहे. शहरातला चौक दिसतो. दूरवर हवामहल इमारत दिसते तेव्हा हे शहर जयपूर आहे, हे लक्षात येतं.
एस. सुखदेव या लघुपटात पुढे याच पद्धतीने देशाच्या विविध शहरांचा तिथल्या एका दिवसातील घटनांचा कोलाज बनवतात. संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा, प्रत्यक्ष वास्तव, लोकजीवन, प्रगतीच्या आकांक्षा आणि त्यातील समस्या, आधुनिकता आणि पारंपरिकता यातील द्वंद्व असे विषय फक्त दृश्यांमधून पुढे येतात. यावर कुठलीही टिप्प्णी न करता ही साखळी पुढे जाते आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वीस वर्षांत काय झालं आणि काय राहून गेलं ते मूकपणे मांडते.
१९६७मधील जयपूर, मद्रास, मुंबई, दिल्ली, बनारस, आग्रा, चंदीगड, गया ही शहरं आणि त्याच्या आसपासचा ग्रामीण परिसर, धरण, जलविद्युत प्रकल्प, अणूभट्टी, पोलाद कारखाने, विमान कारखाना, जहाज बांधणी, मशीन टुल, विविध संशोधन प्रयोगशाळा इथे सुखदेव घेऊन जातात. त्यांच्या शैलीत कधी भेदक, कधी सौंदर्यपूर्णतेने, कधी धाडसीपणे, कधी संथ आणि सूक्ष्म दृष्टीने शेकडो क्षण टिपतात आणि त्यातून काही सांगू पाहतात.
दक्षिणेकडे मद्रासमधली भव्य पुरातन देवालयं आणि त्यावरची शिल्पं, ठिकठिकाणी एम. जी. रामचंद्रन यांच्या सिनेमाची पोस्टर, लोकप्रिय तमिळ सिनेगीतं याचा कोलाज बनतो. १९६६मध्ये चेन्नई इथे समुद्रकाठी वसवलेल्या चोलोमंडल आर्ट व्हिलेजमध्ये कॅमेरा फिरतो. चित्रकार एम. एफ. हुसेन तिथे चित्र काढताना रंगून गेलेले दिसतात. या दृश्य साखळीचं परिवर्तनही प्रत्येक वेळेला एक धक्का देतं, जे या विषयासाठी आवश्यकही आहे.
सुखदेव यांचा कॅमेरा या लघुपटात पहिल्यांदा मुंबई दाखवतो, तो प्रसंग आणि त्यातील काही फ्रेम्स चकित करतात. शिवसेनेच्या डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं पोस्टर, मागण्या फलक आणि भगवे झेंडे दिसतात. कोलाहल ऐकू येतो. वयाने तरुण आणि शर्ट-पॅन्ट घातलेले बाळासाहेब ठाकरे हातात माइक घेऊन बोलतायत, अशी एक ऐतिहासिक फ्रेम दिसते. पोलिस, घोषणा देणारी अनोळखी माणसं, हातात लाठी घेतलेल्या पोलिसांचे चेहरे याचा कोलाज बनतो. तिथून जाणाऱ्या उचभ्रू दिसणाऱ्या दोन स्त्रिया या गर्दीकडे अनोळखीपणे पाहत पुढे जातात, ही सुखदेव यांना तेव्हा जाणवलेली आणि एका क्षणासाठी दिसणारी फ्रेम आजही बोलकी वाटते. इथे जंप कट येतो. रिॲक्टर ऑन असा बोर्ड दिसतो आणि ट्रोम्बे अणूभट्टी परिसर, तिथली यंत्र, तिथल्या आधुनिक ऑफिसमध्ये काम करणारी माणसं दिसतात.
नव्याने वसलेल्या चंदीगडमध्ये सुखदेव जातात. नवी बांधकामं, बिल्डिंग, सेक्टर नंबर, नकाशे घेऊन बसलेली परदेशी मंडळी हे दृश्य सुखदेव काही क्षणांत पालटतात आणि ग्रामीण पंजाब दिसू लागतं. शेतं, गाई म्हशी, जुनी घरं, धुळीचे रस्ते यातून एक गाडी येते. घराबाहेर थांबते. घरातील म्हातारी बाई लगबगीने पुढे येते. गाडीतून उमदे तरुण एस. सुखदेव स्वतः उतरतात. घरात जातात. ते त्यांचं घर आहे. त्यांचा कॅमेरा, टोपी, अन्य सामान बाहेरच्या बाजेवर विसावतं. सुखदेव यांचं शेतकरी घर दिसतं. घरात भिंतीवर गुरू नानक, गांधीजी यांचे फोटो आहेत ते सुखदेव पाहतात. आईशी बोलताना दिसतात. हा या लघुपटाचा एक वेगळाच कोन आहे.
सुखदेव आग्य्रामध्ये ताजमहाल दाखवतात तो गाईडच्या नजरेतून. ठरलेली वर्णन वाक्यं गाईड कोणाशी तरी बोलत असतो तेव्हा त्या साचेबद्ध बोलण्याच्या पार्श्वभूमीवर सुखदेव तिथले काही क्षण जिवंत करतात. दिल्लीत राजघाट, गांधीजींची समाधी आणि बाहेर फुलाचे हार विकणाऱ्या बाईची कथा हातात हात घालून येते. गांधीजी गेले तेव्हा मी माझ्या छोट्या मुलाला घेऊन इथे आले होते. चंदनाची चिता होती. माझ्या त्या छोट्या मुलाला आता तीन मुलं आहेत, असं ती म्हातारी बाई सांगते. इथे सुखदेवना गांधीजी आणि सामान्य माणसांना जोडणार नाट्य दिसतं आणि तेच पडद्यावर येतं. या लघुपटाचा शेवट दिल्लीत २६ जानेवारीला होणाऱ्या परेड या विषयाकडे आहे; पण सुखदेव तिथेही एक वेगळीच कथा शोधतात.
‘इंडिया ६७’ या लघुपटाचा त्यावर्षी सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून सन्मान झाला. एडीनबर्ग फिल्म फेस्टिव्हल, बर्लिन फिल्म फेस्टिव्हल इथेही लघुपटाला पुरस्कार मिळाले. या प्रयोगशील अर्थपूर्ण लघुपटावर लिहिणं हेसुद्धा खरंतर एक आव्हान आहे. लघुपटाची आपल्या संवेदनशीलतेने प्रचीती घ्यावी, हेच खरं.
लघुपट : इंडिया ६७
दिग्दर्शक : एस. सुखदेव
अवधी : ५४ मिनिटे
निर्मिती : फिल्म्स डिव्हिजन
(लेखिका आकाशवाणीच्या माजी निर्मात्या आणि संगीत अभ्यासक आहेत.)