सारिका चाटुफळे-कुलकर्णी, sarikachatuphale.kulkarni@gmail.com
डॉनी गाढव हैदराबादजवळच्या व्हिसा बालाजीला प्रदक्षिणा घालत होते. कोणीतरी त्याला सांगितले होते, की व्हिसा बालाजीला शंभर प्रदक्षिणा घातल्या की अमेरिकेचा व्हिसा लवकर मिळतो. डॉनीला तर अजून अमेरिकेची नोकरीदेखील मिळालेली नव्हती. मग व्हिसा तर दूरचीच गोष्ट होती. त्याच्यासारखे हजारो गाढव तिथे प्रदक्षिणेच्या रांगेत उभे होते. कारण लहानपणापासून त्याने आणि त्याच्या आई-वडिलांनी स्वप्न बघितले होते. एक दिवस डॉनी अमेरिकेत स्थायिक होईल. हल्लीच्या काळात सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना तिकडे जाण्याच्या संधी लवकर मिळत. लहानपणी गेम्स खेळण्यापर्यंत डॉनी गाढवाला मजा येत असे; पण नंतर जेव्हा गंभीरपणे सॉफ्टवेअर या विषयाचा अभ्यास करण्याची वेळ आली तेव्हा लक्षात आले, की हा आपला आवडता विषय नाही; पण तोपर्यंत अखंड गाढव जातीत डॉनी सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार आणि मोठेपणी अमेरिकेला जाणार, याची हाकाटी पिटून झालेली होती. त्यामुळे नाईलाजाने डॉनी आता सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला होता. अमेरिकेत नोकरी मिळवणे मात्र त्याच्या क्षमेतेचे काम नव्हते. कित्येक ठिकाणी अर्ज पाठवून झाले. काही ठिकाणहून उत्तरं आली. काहीवेळा तर मुलाखतदेखील झाली. मुलाखतीत सगळे अज्ञान उघडे पडू लागले की तो घाबरून जात असे.
अशातच यावर व्हिसा बालाजीला नवस बोलण्याचा उपाय कोणीतरी सुचवला होता. म्हणून तो आज प्रदक्षिणा घालायला आलेला होता; पण आपल्या या चिंतेत तो इतका मग्न होता की शंभरच्या वर प्रदक्षिणा झाल्या तरीही डॉनी चालतच राहिला. पुष्कळ वेळ त्याच्याकडे बघत असलेला एक लिओनी नावाचा गाढव त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणाला, ‘‘मित्रा, तू खूपच त्रस्त आहेस. नक्कीच कुठलीतरी खूप मोठी अडचण असणार.’’
खरे तर डॉनीला त्याची कोणतीही अडचण कोणालाच सांगता येणार नव्हती. आई-बाबा नाही की त्याची मैत्रीण चंपी गाढवीण नाही. सगळ्यांच्या नजरेत तो हीरो होता. काहीच दिवसात त्याला अमेरिकेची नोकरी मिळणार होती आणि मग काय...
आपले अज्ञान उघडे पडेल म्हणून डॉनी नवीन गाढवासमोरदेखील शांत राहिला.
गाढवांचे मानसशास्त्र या विषयाचा लिओनीने पुष्कळ अभ्यास केलेला असावा. डॉनी कुठल्या तरी चिंतेत आहे आणि ही चिंता फक्त व्हिसा मिळण्याची नाही हे त्याने लगेच ताडले. त्याने पुन्हा डॉनीला विचारले, ‘‘तुला व्हिसाची अडचण नाहीये मित्रा. माझ्या ते लक्षात आलेले आहे. मग तुला कसली अडचण आहे ते सांगशील का? तुला अमेरिकेला जायचे नाही म्हणून तू नवस बोलायला आलेला आहेस का?’’
डॉनीने चमकून लिओनीकडे बघितले. हे गाढव अजिबातच गाढवासारखे वागत नाही. माणसाच्या घरी बरीच वर्षे नोकरी केल्याचा हा परिणाम असावा.
लिओनी पुढे बोलू लागला, ‘‘तू मला तुझा मित्र समज. अरे भारतात साधारण २० लाख गाढवांची वस्ती आहे; पण हल्ली ऑटोमेशनमुळे आपल्याला इथे नोकरी मिळणे अवघड झालेले आहे. शिवाय माणूस जातच आपल्यासारखी वागू लागलेली आहे. कित्येक आयांना मी मुलांना आपल्यावरून ओरडताना ऐकलेले आहे. गाढवासारखे वागू नकोस म्हणतात. आता बोल. इतके प्रामाणिकपणे वागून जर हे फळ मिळत असेल तर कशाला या देशात चाकरी करायची म्हणतो मी. तू अमेरिकेला जावेस असे मला वाटते मित्रा.’’
लिओनी एवढे बोलल्यावर मित्रच आपल्याशी बोलल्यासारखा डॉनीला वाटले. तोदेखील भाबडेपणाने बोलू लागला, ‘‘अरे हो रे मित्रा. मला खरे तर अमेरिकेत जायचे नाही. डाँकी रेसिंग वगैरे माझ्या आवडीचे विषय आहेत; पण माझे आई-वडील लक्षातच घेत नाहीत. शिवाय, माझी गर्लफ्रेंड असलेली चंपी जी आहे ना, तिलाही मी बाहेरच्या देशात जायला हवे आहे; पण मित्रा, तुला म्हणून सांगतो. अरे मला सॉफ्टवेअरमध्ये अजिबात स्वारस्य नाही. त्यात डिग्री कशीबशी मिळवली; पण मुलाखतीत मला काहीच येत नाही. त्याचे काय करायचे ते सांग. मुलाखत यशस्वी व्हावी म्हणून इथे प्रदक्षिणा घालतो आहे.’’
लिओनी नीट ऐकून घेत होता. तो समजावून सांगू लागला, ‘‘माझ्याकडे एक उपाय आहे. मी पुष्कळ माणसांना हे करताना बघितले आहे. त्यावरून हा उपाय नंतर पुष्कळ गाढवांच्या बाबतीत केला. तुमच्या मुलाखती ऑनलाइन असतील ना?’’
डॉनी म्हणाला, ‘‘हो, बऱ्याचदा
ऑनलाइन असतात.’’
लिओनी म्हणाला, ‘‘मग तू एक काम कर. तुझा बायोडेटा बदल. मी असे ऐकले आहे की अमेरिकन कंपनीमध्ये सिंहांना लगेच नोकरी मिळते. तू सिंह आहेस असे लिही.’’
डॉनीने विचारले, ‘‘अरे ते मी लिहीन; पण मुलाखतीत उघडा पडेन ना. तिथे काही येणार नाही ते नाहीच.’’
लिओनी म्हणाला, ‘‘त्यासाठी तर तुझा हा मित्र आहे. तू पुढे फक्त ओठ हलवायचे. मी मागून सिंहाच्या आवाजात बोलेन. मला सॉफ्टवेअरमधील सगळे जमते. मुलाखत होऊन अमेरिकेत जाईपर्यंत फक्त काळजी आहे. नंतर एकदा आत गेलास की आजूबाजूचे कसे काम करतात ते बघून आपण करायचे. मी खूप गाढवांना सिंह म्हणून नोकरी लावून दिलेली आहे. फक्त एक करायचे. तिथे वावरताना सिंह म्हणून त्याचे कातडे पांघरून वागायचे. फार बोलायचे नाही. आधीचे गाढव सिंह म्हणून गेलेले असल्याने भारतातील सिंह असाच असतो असे तिकडच्या लोकांना वाटते आहे. तूदेखील त्यांच्यातील एक.’’
डॉनीला फार आनंद झाला. काही प्रदक्षिणा घातल्या आणि व्हिसा बालाजीने फळ दिले होते. त्याने हा उपाय मान्य केला.
ठरल्याप्रमाणे सिंहाचे कातडे पांघरून गाढवाने मुलाखत दिली. लिओनीने मागे बसून सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. डॉनीची अमेरिकेतील डुगल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. सगळीकडे आनंदीआनंद झाला. थोड्याच दिवसांत डॉनी अमेरिकेत डुगल कंपनीच्या ऑफिसमध्ये सुरुवातीचे प्रशिक्षण घेत होता. लिओनीचे आणि व्हिसा बालाजीचे किती आभार मानू असे त्याला झालेले होते. आता काही दिवसात चंपी गाढविणीबरोबर लग्न करण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. प्रशिक्षण चालू होते तोपर्यंत काही अडचण आलीच नाही. शिवाय सिंहाचे कातडे त्याने पांघरलेले होतेच. भारतीय सिंह म्हणजे केवढा ज्ञानी! त्याला तिथे खूपच आदर होता. त्यामुळे नुसती एक डरकाळी फोडली तरीही सगळे केवढे तरी आदराने बघत असत. त्याला आता अशी ज्ञानाची खोटी डरकाळी फोडण्यात मजा येऊ लागलेली होती. हळूहळू तो ते करण्यात सराईत झाला होता.
प्रशिक्षण संपले. आता डुगल कंपनीत त्याचे खरेखुरे काम सुरू झाले आणि मग मात्र अडचणी सुरू झाल्या. त्याला कामातील काहीही येत नाही, हे त्याच्या बॉसच्या लक्षात आले; पण जसेही बॉस काही म्हणे, डॉनी गाढव लगेच डरकाळी फोडत असे. काही दिवस या डरकाळीला बॉस घाबरला. एके दिवशी टीम मिटिंग होती. सगळीकडे सिंहच सिंह दिसत होते. त्यातील बरेच भारतीय सिंहच होते. बॉसने काहीतरी प्रश्न विचारला. कोणालाही उत्तर आले नाही. बॉसने शॉनला प्रश्न विचारला. त्याला उत्तर आले नाही. म्हणून बॉस कंटाळून त्याच्यावर ओरडला, तसे सिंह एकदम गाढवाच्या आवाजात रेकला. हे ऐकताक्षणीच बाकीच्या सिंहांनीदेखील गाढवाच्या आवाजात रेकायला सुरुवात केली. आपल्या कंपनीत आलेले हे सिंह नसून गाढव आहेत, हे आता बॉसला कळून चुकले. त्याच दिवशी झम्प नावाच्या अमेरिकी गाढवाने तिथले परराष्ट्रीय धोरण जाहीर केले आणि त्याचा फायदा घेऊन सगळ्या गाढवांची भारतात रवानगी झाली.
मी असे ऐकले आहे की डॉनी गाढव आता लिओनीचा कसून शोध घेत आहे.
पण तुम्ही मात्र सावध व्हा बरं का! तुम्हाला कुठे सिंह दिसलाच तर नीट त्याचा जबडा तपासून बघा. शक्य असल्यास आयाळ खाजवून जबड्यात हात घालून बघा. खरी डरकाळी फोडली तर तो नक्की सिंहच असणार.
तात्पर्य - सिंहाची कातडी पांघरायची असेल तर नुसती पांघरू नये. प्लॅस्टिक सर्जरी करावी.
लेखिका - डुगल कंपनीची व्यवस्थापकीय संचालक.