आयपीएल स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर 30 मार्च रोजी होणार आहे. राजस्थान रॉयल्सचे दुसरं होमग्राउंड आहे. या सामन्याचं महत्त्व खेळाडूंच्या अदलाबदलीमुळे वाढलं आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या ट्रेड विंडोतून चेन्नई सुपर किंग्सने संजू सॅमसनला घेतलं. तसेच रवींद्र जडेजाला रिलीज करत राजस्थान रॉयल्सला दिलं. त्यामुळे दोन दिग्गज खेळाडू परस्पर विरोधी संघातून खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर अजूनही जेतेपदाची झोळी रिती आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. असं असताना या दोन्ही संघांचा 2008 पासून आतापर्यंत रेकॉर्ड कसा आहे ते जाणून घेऊयात
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अतितटीचा सामना होत असल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत या दोन्ही संघात एकूण 31 सामने खेळले गेले आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्सने 16, तर राजस्थान रॉयल्सने 15 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स विजयाची बरोबरी साधणार की चेन्नई सुपर किंग्स वरचढ ठरणार हे सामन्यातील निकालानंतर स्पष्ट होईल. पण दोन्ही संघात अतितटीचा सामना होणार हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. या दोन्ही सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली होती. मागच्या दहा सामन्यांची आकडेवारी पाहिली तर राजस्थान रॉयल्स संघ वरचढ दिसत आहे. कारण मागच्या दहा पैकी 8 सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आला आहे. मागच्या पर्वात गुवाहाटीच्या बरसापरारा मैदानात सामना खेळला गेला. हा सामना राजस्थानने 6 धावांनी जिंकला होता.
बारसापाराची मैदानातील खेळपट्टी ही काळ्या मातीची आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी पूरक आहे. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळणार यात काही शंका नाही. गोलंदाजांना फार काही मदत मिळणार नाही. या खेळपट्टीवर 200च्या आसपास धावा होऊ शकतात. तर धावांचा पाठलाग करणंही सोपं जाईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली जाईल.