Vastu Shastra : व्यवसायामध्ये सतत तोटा होतोय? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेले हे सोपे उपाय
Tv9 Marathi March 29, 2026 10:45 PM

अनेकदा काही गोष्टी या आपल्या मनासारख्या घडत नाहीत, आपला अपेक्षा भंग होतो. अशावेळी आपण नशीबाला दोष देतो. मात्र जर अशा घटना आपल्यासोबत वारंवार घडत असतील तर तो केवळ आपल्या नशीबाचाच दोष नसतो, तर घरात निर्माण झालेले वास्तुदोष देखील त्यासाठी कारणीभूत असू शकतात. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा काहीही कारण नसताना घरात भांडणं होणं, एखादं अचानक मोठं आर्थिक संकट येणं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचं अचानक आजारी पडणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. घरात वास्तुदोष निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत, जसं की आपल्या घरात काही अशा वस्तू असतात ज्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात. किंवा काही वस्तूंची जागा जरी चुकली तरी देखील घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुदोष कसा दूर करायचा? याबद्दल वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

जर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये सतत तोटा होत असेल, कितीही प्रयत्न केला, कष्ट केले तरी आर्थिक घडी व्यवस्थित बसत नसेल. तर त्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे वास्तुदोष दूर होऊन तुमच्या घरात आर्थिक स्थिरता येते, तसेच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये देखील चांगला नफा मिळू शकतो. आज आपण अशाच काही सोप्या उपायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत.

मुख्य दरवाजाचा उंबरा – तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे, कारण याच दरवाजामधून तुमच्या घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजातून नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू नये, यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्यातील पहिला उपाय म्हणजे अंघोळ आणि देवपूजा झाल्यानंतर पाण्यात थोडं गोमूत्र मिसळून त्या पाण्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा दररोज पुसून घेतला पाहिजे, या उपायामुळे सर्व प्रकारची नकारात्माक ऊर्जा ही घरापासून दूर राहते, आणि आपल्याला अपेक्षित फळ मिळतं.

तुमचं जर दुकान असेल तर तुम्ही तुमच्या दुकानात देखील हा प्रयोग करू शकता, जेव्हा तुम्ही दुकानं उघडता तेव्हा दुकानाच्या मुख्य दरवाजाचा उंबरा जिथून ग्राहक दुकानात प्रवेश करतात, त्या दरवाजाचा उंबरा हा गोमूत्र मिसळलेल्या पाण्यानं दररोज पुसून घ्यावा, यामुळे तुमच्या व्यवसायाचं सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होईल असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.