मोठी बातमी! सुषमा अंधारेंच्या फोटो बॉम्बने खळबळ, थेट दाखवले खरातसोबत केसरकरांचे ते फोटो, कोण आहे नामकर्ण आवारे?
Tv9 Marathi March 29, 2026 10:45 PM

आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अशोक खरात प्रकरणात पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आजही काही फोटो दाखवले आहेत. या फोटोवरून त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना काही सवाल केले आहेत?  जेव्हा केसरकर म्हणतात माझ्याविरोधात कट कारस्थान आहे, तेव्हा मला हा गंभीर आरोप वाटत नाही, तर हे अतिशय बालिश आणि हास्यास्पद वाटतं. दुसरा मुद्दा  असा की, दीपक केसरकर म्हणतात 39 लोक गेले, मग मला एकट्यालाच का टार्गेट करत आहेत? याचा अर्थच असा होतो की केसरकर स्वत: मान्य करतात की होय मी अशोक खरातकडे गेलो होतो, मी त्याच्या संपर्कात होतो, असं अंधारे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाले की, केसरकर म्हणाले माझी चौकशी का करायची? नाहीतर मी सर्वांचा भांडाफोड करेल. मी या पत्रकार परिषदेमध्ये आव्हान करते की केसरकर एकदा भांड फोडाच. जे काही 39 नावं आहेत ना ती एकदा सांगून टाकाच, असं आव्हानही त्यांनी यावेळी केसरकर यांना केलं आहे.

दरम्यान आज पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी काही फोटो दाखवले आहेत. हे फोटो दाखवताना त्या म्हणाल्या की, मी काल काही फोटो दाखवले होते. ते फोटो दाखवताना असं म्हटलं होतं की, हा एमआयडीसीमधील गेस्टहाऊसमधील फोटो आहे. हा फोटो मी दोन दिवसांपूर्वी देखील दाखवला होता. या फोटमध्ये एक पिवळा शर्ट घातलेला माणूस दिसून येतो, तो माणूस प्रत्येक फोटोमध्ये दिसून येतो. पण हा माणूस दीपक केसरकरांसोबत काय करतो? याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे. हा माणूस एक -दोन ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी केसरकरांसोबत दिसून येतो. एवढंच नाही तर मी चाकणकरांचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये चाकणकर या खरातची पाद्यपूजा करत होत्या, त्यावेळी देखील हा माणूस खरातसोबत होता. मग हा माणूस कोण आहे? हा माणूस सरखा-सारखा का दिसतो? या मानसाने चाकणकरांचा देखील सत्कार केला होता.

तर या माणसाचं नाव आहे, नामकर्ण एकनाथ आवारे, कोण आहे नामकर्ण एकनाथ आवारे तर जी माहिती मिळते, त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे. मग जगदंब पतसंस्थेचा प्रमुख दीपक केसरकरांसोबत काय करत होता? मी हे समजू शकते की अशोक खरातला तुम्ही गुरू मानलं असेल, मग तुम्ही ज्यांना गुरू मानलं त्या व्यक्तीसोबत तुम्ही मंदिरात दिसणं मी समजू शकते, त्याच्या पाया पडणंही मी समजू शकते, पण तो नामकर्ण एकनाथ आवारे अशोक खरातसोबत काय करतोय? हा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आहे. हा माणूस अजूनही रेकॉर्डवर आलेला नाहीये, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी या माणसाला रेकॉर्डवर आणतीये, असं यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की मी यावर आज का बोलतीये? तर मी जेव्हा या आवारेची माहिती घेतली, तेव्हा लोक दबक्या आवाजात बोलतात, की अनेक बड्या नेत्याचे अधिकाऱ्यांचे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम हा आवारे जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता, असा आरोपही यावेळी आंधारे यांनी केला आहे. आता हे खरं की खोटं? ते पोलिसांनी तपासावं पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं होतं. जो माणूस ब्लॅक पैसे व्हाईट करण्याचं काम करतो, तो केसरकरांसोबत काय करतोय? या माणसासोबत केसरकर सारखे -सारखे दिसत आहेत, आवारे आणि खरातसोबत तुम्ही नेमकं कोणत्या आर्थिक व्यवहारांवर बोलत आहात? याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे,  असं यावेळी अंधारे यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.