गेल्या 5 वर्षांपासून मजूर म्हणून वावर : मूळचे पाकिस्तानी असल्याचा संशय
वृत्तसंस्था/मालेरकोटला
पंजाब आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत पंजाबमधील मालेरकोटला येथे दोन संशयित पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली. पोलीस सूत्रांनुसार, संशयितांची ओळख अब्बू गाबा हुरैरा आणि उस्मान अशी पटली आहे. त्यांना शनिवारी शेरवानी कोटे गावात ताब्यात घेतल्यापासून कसून चौकशी केली जात आहे. हे संशयित गेल्या पाच वर्षांपासून मालेरकोटला येथे मजूर म्हणून वावरत असल्याची माहितीही उजेडात आली आहे. ड्रग्जविरोधी मोहिमेदरम्यान मालेरकोटला येथे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका स्थानिक ड्रग्ज तस्कराच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली. यापैकी एका दहशतवाद्यावर तपास यंत्रणांकडून 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
पोलिसांनी अब्बू गाबा हुरैरा आणि उस्मान यांच्या अटकेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. सीआयएचे प्रभारी हरजिंदर सिंग यांनी याप्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला. परंतु शेरवानी कोट गावचे सरपंच सिमरनजीत सिंग यांनी सीआयएच्या पथकाने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने शनिवारी त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते दोघे सुमारे पाच वर्षांपासून त्यांच्या गावात राहत होते आणि मजूर म्हणून काम करत होते. मात्र, गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते सुमारे 15 वर्षांपासून जिह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये राहत होते. दोघांनीही आपण जम्मू काश्मीरचे रहिवासी असल्याचा दावा केला होता. मात्र, दोघेही पाकिस्तानी होते आणि कोणालाही त्यांच्यावर कधीच संशय आला नाही. सध्या ते स्थानिक लोकांमध्ये मिसळून गेले होते.