Vivian Dsena Welcomes Baby Boy: बिग बॉस 18 (Bigg Boss 18) तसेच मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता विवियन डिसेना (Vivian Dsena) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. विवियन वडील झाला आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने बाळाला जन्म दिला आहे. विवियनने यासंदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. विवियनने आनंदाने आपल्या बाळाचं स्वागत केलं आहे. अभिनेत्याने सोशल मीडियात पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते तसेच इतर कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विवियनची दुसरी पत्नी नूरन ही दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिनं मुलाला जन्म दिला आहे. विवियनने वडील झाला असल्याचा आनंद पोस्टद्वारे इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये, 'काही काळ आम्ही लाइमलाइटपासून दूर होतो. परंतु, यांचं एक कारण होतं. काही गोष्टींची आधीच घोषणा केली जात नाही. तर, त्या गोष्टी आधी जगल्या जातात. शांततेत सर्व काही सांगितलं. आमचा परिवार आता अजून मोठा झाला आहे. आता आमच्या परिवारात आणखी एका राजकुमाराची एन्ट्री झाली आहे'.
विवियनने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका युझरने अभिनेत्याच्या पोस्टवर, 'खूप शुभेच्छा. बातमी ऐकून आम्हाला आनंद झाला', अशी कमेंट केली आहे. तर, आणखी एका युझरने, 'तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. लहान बाळाला खूप सारं प्रेम', अशी कमेंट केली आहे. कलाकारांनीही अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. टीव्ही कलाकार रुबीना दिलैक आणि भारती सिंह यांनीही विवियनला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
विवियन बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचं पहिलं लग्नही झालं होतं. दरम्यान, त्याचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. विवियनने पहिलं लग्न वाहबिज दोराबजीबरोबर केलं होतं. दोघांची पहिली भेट एका मालिकेच्या शुटिंगदरम्यान झाली होती. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2013 साली लग्न केलं. मतभेदांमुळे दोघांनी 2021 मध्ये काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. दोघांना 2 मुली आहेत.
विवियनने नंतर पत्रकार नूरान हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. 2022 मध्ये त्यांनी लग्न केलं असल्याची माहिती आहे. या जोडप्याला आधी एक मुलगी झाली. आता एक मुलगा झाला.