बापासाठी काय पण… ममता शिवतारे यांनी वडील आमदार विजय शिवतारे यांना किडनी केली दान
Tv9 Marathi March 30, 2026 09:45 PM

मुलगी आणि वडील यांच्यातील नाते हे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नाते असते. आपल्या लेकीसाठी बाप आपल्या जीवाचं रान करतो. मुलीवर चांगले संस्कार करतो, तिला चांगले शिक्षण देतो. तिच्या लग्नासाठी आयुष्याची कमाई खर्च करतो. लेकीचा आईपेक्षा बापावर जास्त जीव असतो हे सर्वांनी अनुभवलेले असेल. अशातच आता बापासाठी लेकीने आपली किडनी दान केल्याचे समोर आले आहे. आमदार विजय शिवतारे यांना मुलगी ममता शिवतारे यांनी किडनी दान दिली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या बाप लेकीच्या नात्याची चर्चा होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ममता शिवतारे यांच्याकडून वडिलांना किडनी दान

समोर आलेल्या माहितीनुसार, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे गेल्या काही काळापासून किडनी फेल झाल्यामुळे डायलिसिसवर होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. पण अशा कठीण वेळी त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून त्यांची लेक डॉ. ममता विजय शिवतारे पुढे आली आणि तिने विजय शिवतारे यांना किडनी दान देण्याचा निर्णय घेतला. एक डॉक्टर, एक कर्तव्यदक्ष मुलगी आणि आता वडिलांना नवजीवन देणारी देवदूत म्हणून ममता यांचे कौतुक होत आहे.

मुंबईत पार पडली किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया

वडिलांच्या जीवनासाठी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेत ममता यांनी केवळ कर्तव्य नाही, तर अपार प्रेमाची पराकाष्ठा दाखवली आहे. मुंबईत आज किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया पार पडली. या दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे असं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. एका लेकीचा हा त्याग, केवळ एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण पुरंदर आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. खरंच… देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणूनच कदाचित तो लेकीच्या रूपाने आपला दूत पाठवतो अशी भावना व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत विजय शिवतारे?

विजय शिवतारे यांना बापू म्हणूनही ओळखले जाते, हे शिवसेनेचे आमदार आहेत. ते 2009 मध्ये आणि पुन्हा 2014 मध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यांना 2019 च्या विधानसभा निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र 2024 मध्ये ते पुन्हा निवडून आले. याआधी त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केलेले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.