मुंबई : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मार्च महिन्यात मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागला आहे. मार्च महिन्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 44 लाख कोटींनी कमी झालं आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी देखील शेअर बाजारात विक्रीचं सत्र दिसून आलं. सेन्सेक्स आणि निफ्टीसह इतर मोठे निर्देशांक 2 टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीसह बंद झालं आहे.
भारतीय शेअर बाजारावर मार्च महिन्यात मोठं संकट आल्याचं पाहायला मिळालं. मार्च महिन्यात गुंतवणूकदारांची संपत्ती 44 लाख कोटींनी कमी झाली आहे. 31 मार्चला भारतीय शेअर बाजाराला सुट्टी आहे. 30 मार्चला शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांचं एका दिवसात 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
2 मार्चला भारतीय शेअर बाजारात बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 456 लाख कोटी होतं. 30 मार्चला बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 412 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचं 44 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.
भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1635.67 अंकांनी म्हणजेच 2.22 टक्क्यांनी घसरुन 71947.55 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 488.20 अंकांची घसरण झाली. निफ्टी निर्देशांक 22422.85 अंकावर बंद झाला. क्रूड ऑईलचे वाढते दर, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाची वाढलेली तीव्रता यामुळं गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. मेटल आणि ऑइल अँड गॅस सेक्टर सोडून इतर सेक्टोरल निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
मार्च महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 10.5 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. कच्चा तेलाच्या दरातील वाढ आणि विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतल्यानं शेअर बाजारात घसरण दिसून आली.
आर्थिक वर्ष 2025-26 चा शेवटचा दिवस आहे. सेन्सेक्समध्ये या वर्षात 5.3 टक्क्यांची घसरण आणि निफ्टीत 3.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2020 नंतरचा शेअर बाजारासाठी सर्वाधिक खराब महिना मार्च 2026 ठरला आहे.
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्याचं बाजारमूल्य 422.15 लाख कोटींवरुन 9.71 लाख कोटींनी कमी होऊन 412.44 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचं 9.71 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
सेन्सेक्सवरील 30 पैकी 28 शेअर आज घसरणीसह बंद झाले. बजाज फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आज सेन्सेक्सवर टेक महिंद्रा आणि पॉवरग्रीडच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.निफ्टी 50 वरील 44 शेअर घसरणीसह बंद झाले तर केवळ 6 शेअर तेजीसह बंद झाले.
पुढं काय घडणार?
टेक्निकल रुपयात निफ्टीसाठी 22300 हा महत्त्वाचा सपोर्ट आहे. निफ्टी 50 या स्तरावर टिकू शकला नाही तर त्यात वेगानं घसरण होऊ शकते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा