निरगुडसर - थोरांदळे (ता. आंबेगाव) गावातील पाईनमळा परिसरात घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी दामोदर जयराम मिंडे (वय-६२) या वृद्धाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत दामोदर मिंडे यांची मुलगी सौ. गितल सतीश गावडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, थोरांदळे येथील पाइनमळा येथे दामोदर जयराम मिंडे (वय-६२) हे एकटेच राहत असून (ता. २९) मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:३० ते (ता. ३१) मार्च २०२६ रोजी सकाळी ८:४५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात प्रवेश करून फिर्यादीचे वडील दामोदर जयराम मिंडे यांच्या डोक्यात धारदार अथवा कठीण हत्याराने वार करून गंभीर दुखापत केली.
या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (ता. ३१) मार्च रोजी उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी तसेच खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्याचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे थोरांदळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पोलीसांकडून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली आहे.