Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला
Saam TV March 31, 2026 11:45 PM

विजय पाटील, सांगली, साम टीव्ही

जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर आता विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीआधी सांगलीतील राजकारण तापलं आहे. सांगलीत दोन पाटील आमनेसामने आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांना लक्ष्य केलं. जिथे जिथे शक्य आहे, तिथे बिब्बा टाकायचा, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटीलयांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधल्यानं सांगलीतील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. जयंत पाटील यांचा इतिहास आहे. जिथे शक्य आहे, तिथे बिब्बा टाकायचा, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास बाबर यांच्यात देखील जयंत पाटलांनीच बिब्बा टाकला, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

पडळकरांकडून शिवसेना शिंदे गटाचे आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील यांच्या बोगस कुणबी प्रमाणपत्र कारवाईच्या मागणीला पाठिंबा देत, जर बोगस कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले असेल तर संबंधित जात पडताळणी अधिकाऱ्यावर कारवाई होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सांगली जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडीमध्ये चमत्कार होईल. पिक्चर अभी बाकी आहे, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवड उद्या बुधवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, मंगळवारी सांगली जिल्हा परिषद सदस्यांची सांगलीत बैठक घेतली. या बैठकीला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्यांना विविध सूचना केल्या आहेत.

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.