4700 सुरक्षा कर्मचारी, 760 शाळा ते 300 आरोग्य केंद्र, अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणने काय गमावलं?  
एबीपी माझा वेब टीम April 01, 2026 12:13 AM

Iran US War : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं दोन्ही देशांचं मोठं नुकसान होत आहे. एक महिना उलटून गेला असला तरी, हा संघर्ष कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या संघर्षामुळे अमेरिका आणि इराण, तसेच इतर आखाती देशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या संघर्षामुळे लाखो लोक आपली नोकरी गमावू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, या संघर्षामुळे इराणला सर्वाधिक फटका बसला आहे. दुसरीकडे, अमेरिका आपल्या भूमीवर युद्ध लढत नसल्यामुळं, त्यांचे नुकसान कमी होत आहे.

अमेरिकेसोबतच्या युद्धामुळं इराणी लोकांचे मोठे नुकसान

अमेरिकेसोबतच्या युद्धामुळं इराणी लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. 4700 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तेहरानसह देशभरात 90 हजार 63 घरांचे नुकसान झाले आहे. 307 रुग्णालये आणि इतर वैद्यकीय सुविधांचे नुकसान झाले असून, 760 शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. संघर्षाच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेने तेहरानमधील अनेक ठिकाणी हल्ले केले. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 हजार 880 लोक गंभीर जखमी झाले आहेत.

अणुकेंद्रांपासून ते शस्त्रास्त्रांपर्यंत, इराणला मोठा फटका 

युद्धादरम्यान अमेरिकेने इराणच्या अणुसुविधांचे नुकसान केल्याचा दावा करण्यात आला होता. यासोबतच शस्त्रास्त्रांची संख्याही कमी झाली आहे. तथापि, अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. इराणने अमेरिका आणि इस्रायलवर अनेक क्लस्टर बॉम्बचा वापर केला असून, त्यांची संख्याही कमी झाली आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणला मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. त्याचबरोबर घरांचे नुकसान झाले आहे, शाळा, आरोग्य केंद्र उद्धवस्थ झाली आहेत. 

इराणबाबत अमेरिकेचा मोठा दावा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इराणबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, येणारे दिवस निर्णायक असतील. हेगसेथ म्हणाले, "इराण लष्करीदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे; ते याबद्दल काहीही करू शकत नाहीत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणी कमांडरांचे मनोधैर्य खचत आहे. जर इराण शहाणा असेल, तर तो करार करेल. जर करार झाला नाही, तर अमेरिका आणखी प्राणघातक हल्ला करेल. जर इराण शहाणा असेल, तर तो करार करेल. जर इराणने करार केला नाही, तर अमेरिकन सैन्य आणखी मोठ्या जोमाने आपल्या कारवाया सुरू ठेवेल. ट्रम्प केवळ दिखावा करत नाहीत, किंवा ते आपल्या शब्दांवरून मागे हटत नाहीत. इराणच्या नवीन राजवटीने आतापर्यंत हे समजून घेतले पाहिजे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.