संकट काळातही माणुसकीचा ओलावा!
व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यात हॉटेलमालकांचा कामगारांना मोठा आधार
पाली, ता. २ (वार्ताहर) : सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धाच्या ठिणगीचा फटका थेट स्थानिक हॉटेल व खाणावळ व्यवसायाला बसला आहे. गॅस व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने अनेक हॉटेलना टाळे लागले आहेत, तर काही ठिकाणी लाकूड फाटा आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या आधारावर व्यवसाय तग धरून आहे. मात्र, या आर्थिक ओढाताणीच्या काळातही अनेक हॉटेलमालकांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर न सोडता ‘माणुसकीचा धर्म’ जपल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
हॉटेल व्यवसायात आचारी आणि वेटर हे कणा मानले जातात. गॅसअभावी व्यवसाय संकटात असताना श्रीवर्धन दिवेआगर येथील हॉटेल व्यावसायिक गणेश सावंत यांनी आदर्श पायंडा घातला आहे. ते म्हणतात, गॅस उपलब्ध नसला तरी आम्ही लाकडी चुलीवर मर्यादित जेवण बनवत आहोत. पण अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या एकाही कामगाराला आम्ही काढलेले नाही. कठीण काळात त्यांना साथ देणे, हे आमचे कर्तव्य आहे. अशीच भूमिका पालीतील हॉटेल व्यवस्थापक स्वप्नील निर्णय यांनी मांडली.
हॉटेल कामगार प्रदीप दळवी यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले की, ‘सध्या हॉटेल बंद असले तरी आमच्या मालकांनी आमची राहण्याची आणि खाण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे आमचा पगारही सुरू ठेवला आहे, ज्यामुळे आमच्या कुटुंबाची उपासमार टळली आहे.’
पालीतील हॉटेल व्यावसायिक राजेश बेलोसे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, आमचे हॉटेल छोटे असल्याने सर्व व्यवहार रोजच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. अनेक दिवसांपासून हॉटेल बंद असल्यामुळे कामगारांना पूर्ण पगार देणे कठीण जात असले, तरी त्यांना शक्य तितकी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. थोड्या दिवसांसाठी हॉटेल बंद राहिले असते तर पूर्ण सहाय्य करणे सोपे झाले असते. मात्र, या संकटातही कामगारांचे नुकसान होऊ नये हीच आमची भावना आहे.