अर्थबोध : आगामी काळातील बाजाराचे मोठे टप्पे
esakal April 06, 2026 08:45 AM

गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक

सध्या शेअर बाजारात चढ-उतार सुरू असले, तरी जागतिक ब्रोकरेज फर्म ‘जेफरीज’ भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत कमालीची सकारात्मक आहे. ‘जेफरीज’च्या मते, भारतीय शेअर बाजार सध्या एका ‘हेल्दी कन्सॉलिडेशन’मधून जात असून, मार्च २०२८ पर्यंत ‘निफ्टी’ २८,००० चा टप्पा गाठू शकतो. सध्याची बाजारातील मरगळ ही कायमस्वरूपी नसून, ती पुढील मोठ्या तेजीची तयारी आहे. शेअर बाजार पुढील दोन-तीन वर्षांत नव्या उच्चांकावर जाऊ शकतो, असा विश्वास ‘जेफरीज’ने व्यक्त केला आहे. यामागे भारताची मजबूत अर्थव्यवस्था, वाढता कॉर्पोरेट नफा, मजबूत देशांतर्गत गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांवरील मोठा खर्च ही प्रमुख कारणे आहेत. विशेषतः ऊर्जा, रिअल इस्टेट, खासगी बँका, युटिलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हीच मोठी संधी आहे.

महत्त्वाचे टप्पे

‘जेफरीज’ने मार्च २०२८ पर्यंतचा दृष्टिकोन ठेवून बाजाराची तीन भागांत विभागणी केली आहे.

१) बुल केस

‘निफ्टी’ २८,०००

परिस्थिती ः सर्व काही अपेक्षेपेक्षा चांगले घडले, तर ‘निफ्टी’ २८,००० चा टप्पा गाठू शकतो.

मुख्य कारणे : जागतिक स्तरावर सुरू असलेले युद्ध आणि भू-राजकीय तणाव पूर्णपणे निवळणे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होणे. भारतीय कंपन्यांच्या नफ्यात २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होणे.

सद्यःस्थिती : सध्या रशिया-युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील तणाव कायम आहे. हे प्रश्न सुटले, तर परदेशी गुंतवणूकदार (एफआयआय) मोठ्या प्रमाणात भारतात पैसा ओततील, ज्यामुळे ही ‘बुल केस’ यशस्वी होईल.

२) बेस केस

‘निफ्टी’ २५,०००

परिस्थिती : ‘जेफरीज’च्या मते ही परिस्थिती घडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. यात ‘निफ्टी’ २५,००० पर्यंत पोहोचू शकतो.

मुख्य कारणे : सध्याच्या स्तरापासून १०-१२ टक्के वाढीची अपेक्षा. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) ६.५ ते ७ टक्क्यांदरम्यान स्थिरावणे. सामान्य मान्सून आणि देशांतर्गत मागणीत सातत्य.

सद्यःस्थिती : भारतीय बाजार सध्या एका ‘कन्सोलिडेशन’ टप्प्यात आहे. २५,००० चा स्तर हा एक वास्तववादी अंदाज वाटतो, जो मध्यम जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोषक आहे.

३) बेअर केस

‘निफ्टी’ २२,४००

परिस्थिती : जागतिक किंवा देशांतर्गत पातळीवर नकारात्मक घडामोडी घडल्या, तर ‘निफ्टी’ २२,४०० पर्यंत खाली येऊ शकतो.

मुख्य कारणे : महागाई वाढल्यामुळे व्याजाचे दर कमी न होणे. जागतिक मंदीचा भारताच्या निर्यातीवर परिणाम होणे. निवडणुकांचे निकाल किंवा राजकीय अस्थिरतेची भीती.

सद्यःस्थिती : अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजाचे दर अपेक्षेप्रमाणे कमी केले नाहीत, तर बाजारात तात्पुरती घसरण होऊन ‘निफ्टी’ या स्तराला स्पर्श करू शकतो.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला

सध्या बाजार ‘बेस केस’च्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, वरच्या स्तरावर जाण्यासाठी कंपन्यांच्या तिमाही निकालांची साथ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांनी एकाच वेळी सर्व पैसे न लावता, प्रत्येक घसरणीत दर्जेदार शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. रिअल इस्टेट, ऊर्जा आणि खासगी बँका या क्षेत्रांवर विशेष लक्ष ठेवा, कारण ‘जेफरीज’ने या क्षेत्रांना सर्वाधिक पसंती दिली आहे. बाजारात सध्या सरसकट सर्वच शेअर वाढतील असे नाही. त्यामुळे उत्तम शेअर निवडा. बाजार पडला, तर घाबरू नका, तर ती चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी समजा.

(डिस्क्लेमर - ही माहिती अभ्यासासाठी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराची मदत घ्या.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.