ढिंग टांग : चाय की पत्ती, बस की सवारी..!
esakal April 06, 2026 08:45 AM

बेटा : (नेहमीप्रमाणे जोरदार एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!

मम्मामॅडम : (निवडणुकीच्या कामात व्यस्त) हुं!!

बेटा : (पोटावर हात फिरवत) मम्मा, डु वी हॅव जिंजर अँड लेमन? आय मीन आलं लिंबू?

मम्मामॅडम : (चमकून मान वर करत) हे काय आता नवीन?

बेटा : (तोंड कडवट करत) थोडं मळमळतंय!

मम्मामॅडम : (ताडकन हातातलं काम सोडून) ओह गॉड! काय झालं? काही वेडंवाकडं खाल्लं असशील..!

बेटा : (खुलासा करत) केरळात प्रचार करत होतो...

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) कुठल्या गाडीवर डोसे घातलेस? की वडे तळलेस? की तळ्यात उडी मारलीस? की टपरीवर भजी खाल्लीस? तुझे प्रचार दौरे म्हणजे डोकेदुखी असते माझ्यासाठी! काळजी घ्यावी रे स्वतःची...

बेटा : (ओशाळून) आळापुळा ते नामुंडी बसने प्रवास केला! स्टँडिंग..!

मम्मामॅडम : (कपाळाला आठी घालून) जे लोक शेजारची सीट ऑफर करत नाहीत, ते मतं काय देणार?

बेटा : (पुन्हा खुलासा करत) मीच उभा राहून गप्पा मारत होतो! अधून मधून बसत होतो, पण लोकांशी उत्तम संवाद झाला! त्यांना मी आपल्या पक्षाची धोरणं समजावून सांगितली! मोदीजींनी देशाची कशी वाट लावली आहे, ते पटवून दिलं त्यांना! केरळच्या डाव्यांमध्ये आता डावंउजवं काहीही शिल्लक राहिलेलं नाही, हेही त्यांना सांगितलं!!

मम्मामॅडम : (उत्सुकतेनं) मग काय म्हणाले ते?

बेटा : (विजयी मुद्रेनं) ते म्हणाले की गुड, आमचं मत तुम्हालाच! मी म्हणालो, ओक्के!! तुम्हाला यापुढे सगळे बसचे प्रवास फ्री!!

मम्मामॅडम : (स्वप्नाळूपणानं) मग?

बेटा : (खांदे उडवत) मग काय? मग मला त्यांनी म्हटलं, ‘‘उभेका बसाकी’’!!

मम्मामॅडम : (नाक मुरडत) तू इकडे बसमधून केरळमध्ये फिरलास, तिकडे आसामच्या दिब्रुगडमध्ये एक माणूस चहाची पत्ती तोडत होतं!!

बेटा : (उत्साहात) वॉव! मम्मा, मलासुद्धा चहाची पत्ती तोडायची आहे...

मम्मामॅडम : (वर्तमानपत्र फेकत फणकाऱ्याने) हे वाच! मोदीजी दिब्रुगडमध्ये चहाच्या मळ्यात गेले, आणि तिथं चहाची कोवळी पानं तोडायला शिकले म्हणे! काय काय तरी थेरं करायची निवडणुका जिंकण्यासाठी!! हुं:!!

बेटा : (कडवटपणाने) मी नेहमी खरं बोलत असतो! ही असली कोवळी पानं निवडण्यात काय शौर्य आहे? हिंमत असेल तर समुद्रात उडी मारून दाखवा! तळ्यात उडी मारून दाखवा! गाडीवर डोसे घालून दाखवा! सुतारकाम करून दाखवा! केरळच्या बसमधून उभ्यानं प्रवास करून दाखवा! (एकदम आठवून) आलं लिंबू देतेस ना?

मम्मामॅडम : (गंभीरपणाने) ही दाखवेगिरी शोभते का प्रधानमंत्र्यांना? प्रसिद्धीसाठी हे कमळवाले काहीही करतील! आज चहाची पत्ती तोडली, उद्या करून दाखवतील!

बेटा : (विकट हास्य करत) ते शक्य नाही! ग्यास कुठाय? हाहा!!

मम्मामॅडम : (संतापाने) इथे देशाची वाट लागतेय, त्याचं काही नाही! निम्मं जग युद्धाच्या आगीत होरपळतंय, आणि हे चहाची पत्ती तोडत बसले आहेत!

बेटा : (शंकेखोरपणाने) चहा इतका वाईट असतो?

मम्मामॅडम : (खचलेल्या सुरात) आपल्या पक्षाला तरी बाधला!! मी गेली दहा-बारा वर्ष साधा लेमन टीसुद्धा पीत नाही! चहा आणि चहावाला म्हटलं की माझी ॲसिडिटी वाढते!!

बेटा : (कंटाळून) पण केरळात फिल्टर कॉफी मिळते बरीच!!

मम्मामॅडम : (प्रोत्साहन देत) कॉफी डावी, चहा उजवा!! लक्षात ठेव! कळलं का? मळमळतंय ना? आलेपाक देऊ का तुला?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.