शेअर बाजार : वाडिलाल इंडस्ट्रीज
esakal April 06, 2026 08:45 AM

(शुक्रवारचा बंद भाव : रु. ४२९६)

भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक

वाडिलाल इंडस्ट्रीज ही कंपनी १९०७ मध्ये एक सोडा कंपनी म्हणून स्थापित झाली. कंपनीचे मालक वाडिलाल गांधी सुरुवातीला ‘कोठी’ पद्धतीचा (लाकडी बादलीत बर्फ आणि मीठ वापरून हाताने फिरवण्याचे यंत्र) वापर करून आइस्क्रीम बनवत असत. तीन पिढ्यांनंतर आता ही कंपनी आइस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टच्या क्षेत्रातील एक मोठी कंपनी असून, १९८२ मध्ये वाडिलाल इंडस्ट्रीज लि. या नावाने तिची शेअर बाजारात अधिकृत नोंदणी झाली. १०० वर्षांहून अधिक काळाच्या वारशामुळे हा भारतातील सर्वांत जुना आणि आघाडीचा आइस्क्रीम ब्रँड बनला आहे.

आइस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट : हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. वाडिलालकडे १५० हून अधिक फ्लेव्हर आणि विविध प्रकारांचे आइस्क्रीम उपलब्ध आहेत. एकूण महसुलात याचा वाटा ७० ते ७५ टक्के आहे.

प्रोसेस्ड फूड्स : यामध्ये गोठवलेल्या भाज्या, तयार अन्न, ब्रेड, पनीर, फळे आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश होतो. हा विभाग मुख्यत्वे निर्यातीवर लक्ष केंद्रित करतो. एकूण महसुलात याचा वाटा २०-२५ टक्के आहे.संघटित आइस्क्रीम बाजारपेठेत वाडिलालचा वाटा सुमारे २० टक्के आहे. कंपनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपसह ४५ हून अधिक देशांमध्ये निर्यात करते. विशेषतः अमेरिकेतील भारतीय समुदायामध्ये हा एक अग्रगण्य ब्रँड आहे.

कुटुंबातील वाद आणि तोडगा

वाडिलाल समूहात अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबातील सदस्यांमध्ये मालकी हक्क आणि व्यवस्थापनावरून कायदेशीर वाद सुरू होते. मार्च २०२५ मध्ये गांधी कुटुंबाने आपले अंतर्गत वाद मिटवून एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारान्वये मालकी आणि व्यवस्थापनाचे विलगीकरण करण्यात आले आणि कुटुंबाने कंपनीच्या दैनंदिन कामकाजातून बाजूला होऊन व्यावसायिक व्यवस्थापकांकडे सूत्रे सोपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कंपनीचे व्यावसायिक व्यवस्थापन आता सुधारण्याची अपेक्षा आहे.

व्यवस्थापन मार्गदर्शन

कंपनीने येत्या चार ते पाच वर्षांत आपल्या विक्रीत १५ टक्के चक्रवाढ दराने वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महागाई आणि कच्च्या मालाचे भाव वाढूनही कंपनीने मार्जिन १५ ते १६ टक्क्यांच्या वर राखण्याचा प्रयत्न केला आहे. भौगोलिक विस्तारात दक्षिण भारतावर इतर कौटुंबिक करारांमुळे मर्यादा असल्या, तरी उत्तर आणि पूर्व भारतात वितरकांचे जाळे अधिक मजबूत करणे आणि ग्रामीण भागात विस्तार करण्यावर भर दिला जात आहे; तसेच उत्पन्नाच्या किमान चार टक्के भाग जाहिराती आणि ब्रँडिंगवर खर्च करण्याचे व्यवस्थापनाचे धोरण आहे.

भांडवली खर्च; विस्तार योजना

ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी कंपनी आइस्क्रीम पार्लर्स’ व ‘फ्रीझर ऑन व्हील्स’ या संकल्पनांचा विस्तार करत आहे. अमेरिकेतील वाढती मागणी पाहता, तेथे नवे लॉजिस्टिक हब आणि वितरण केंद्रे उभारली जात आहेत. नवी उत्पादने आणण्याची तयारी सुरू आहे.

आर्थिक आकडेवारी

३०८९ कोटींच्या बाजारमूल्याच्या या कंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांमध्ये २१ टक्के आणि ४९ टक्के चक्रवाढ दराने वाढले आहेत. आरओसीई आणि आरओई २५.३ आणि २४ म्हणजे उत्तम आहेत. कंपनीने २०२५ मध्ये १२३८ कोटी रुपयांची विक्री केली आणि १५० कोटी रुपये निव्वळ नफा दाखवला. कार्यचालन मार्जिन गेल्या दोन वर्षांमध्ये १९ ते २० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. कंपनीची रोख आवक आणि खेळत्या भांडवलाचे नियोजन समाधानकारक आहे. कंपनीचा ताळेबंद ११५६ कोटी रुपयांचा असून, त्यात १४९ कोटी रुपये रोकड आणि गुंतवणुकीत आहेत. कर्ज/भागभांडवल गुणोत्तर ०.२६ म्हणजे कर्ज माफक आहे.

मूल्यांकन : कंपनीचा शेअर सध्या २५.३ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे. पाच वर्षांचा सरासरी पीई २१.२ आहे. पीईजी ०.५१ आणि ईव्हीईबीटा गुणोत्तर १४.६ आहेत. पिट्रोस्की गुणोत्तर सहा म्हणजे ठीक आहे.

निष्कर्ष

आइस्क्रीम व्यवसायातील ही एक आघाडीची कंपनी आहे. नफावाढीचा विचार करता कंपनीचा शेअर आकर्षक मूल्यांकनात उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांनी या कंपनीचा जरूर अभ्यास करावा.

(डिस्क्लेमर : हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.