सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
डिजिटल पेमेंटमुळे बँक ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने, त्याचे गांभीर्य विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) डिजिटल पेमेंटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामुळे डिजिटल पेमेंट आणखी सुरक्षित होईल. नव्या नियमांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू झाली आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास बँकेची आणि ग्राहकाची जबाबदारी काय असेल, हेही विशद केले आहे.
दुहेरी सुरक्षा व्यवस्था
आता कोणत्याही डिजिटल पेमेंटचे (उदा. यूपीआय/डेबिट/क्रेडिट कार्ड/वॉलेट पेमेंट) किमान दोन वेगवेगळ्या पद्धतीने प्रमाणीकरण (टू फॅक्टर ऑथेंटिकेशन-२ एफए) करणे बंधनकारक असणार आहे. यातील एक पद्धत डायनॅमिक म्हणजे प्रत्येक व्यवहारासाठी बदलणारी असणे आवश्यक असणार आहे. म्हणजे आपला पिन किंवा पासवर्ड किंवा बोटाचे ठसे तसेच चेहरा हे व्यवहारानुसार बदलत नाही मात्र, ओटीपी किंवा टोकन प्रत्येक व्यवहारास वेगळे असतो. थोडक्यात, आता कोणतेही डिजिटल पेमेंट करताना पिन/पासवर्ड/बोटाचा ठसा/चेहरा यासह ‘ओटीपी’ किंवा टोकनचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू केले जातील. (जसे, फेसआयडी)
बँकांची जबाबदारी
एखाद्या तांत्रिक त्रुटीमुळे किंवा सुरक्षेतील कमतरतेमुळे ग्राहकाची फसवणूक झाली, तर त्याची जबाबदारी संबंधित बँक किंवा पेमेंट कंपनीवर असेल. नियमांचे पालन न झाल्यास बँकांना ग्राहकांना संपूर्ण नुकसानभरपाई द्यावी लागेल. अशा फसवणुकीत रक्कम पाठविणारी व रक्कम जमा करून घेणारी बँक या दोघांची सामुदायिक जबाबदारी असेल.
ग्राहकाची जबाबदारी
ग्राहकाने आपला पिन/पासवर्ड; तसेच आलेला ‘ओटीपी’ दुसऱ्यास दिला असल्यास किंवा डिजिटल पेमेंट करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्यास अशा व्यवहारासाठी तो स्वतःच जबाबदार असेल व याची नुकसान भरपाई मिळणार नाही.
ग्राहकांसाठी सूचना
आपले बँक ॲप; तसेच यूपीआय ॲप (उदा. गुगलपे/फोनपे/भीम) यांचे पिन/पासवर्ड एका ठरावीक काळाने बदलत राहा. (किमान तीन महिन्यांतून एकदा) मोबाइलमध्ये बायोमेट्रिक्स (फिंगरप्रिंट/ फेस आयडी) कार्यान्वित करून ठेवा, जेणेकरून पेमेंट करणे सोपे जाईल.