US Rescue Operation : इराणमध्ये पायलटला वाचवताना अमेरिकेने स्वत:च 10 कोटी डॉलरचं महागड विमान तिथेच का नष्ट केलं? कारण काय?
GH News April 06, 2026 06:11 PM

इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात अमेरिकेने नुकतचं आपलं युद्ध कौशल्य दाखवून दिलं. सगळ्या जगात आज अमेरिकेच्या या स्पेशल ऑपरेशनची चर्चा सुरु आहे. अमेरिकेने या निमित्ताने आपली उच्च लष्करी क्षमता, टेक्नोलॉजी दाखवून दिली. अमेरिकेने हे जे ऑपरेशन पार पाडलं ते अजिबात सोपं नव्हतं. 3 एप्रिलला इराणने अमेरिकेचं अत्याधुनिक F-15 विमान पाडलं. या विमानात एक वैमानिक आणि वेपन ऑफिसर असे दोन जण होते. हे विमान इराणच्या क्षेत्रात कोसळलं. अमेरिकेचे दोन सैनिक इराणच्या भूमीत म्हणजे शत्रुच्या प्रदेशात होते. त्यांना तिथून सुरक्षित बाहेर काढणं म्हणजे एक खतरनाक मिशन होतं. हे दोन्ही अमेरिकेचे वायू सैनिक इराणच्या हाती लागले असते, तर अमेरिकेची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्याशिवाय अमेरिकेला दबावाखाली आणण्याची इराणला संधी मिळाली असती.

काहीही करुन अमेरिकेला आपल्या दोन्ही वायू सैनिकांना सुरक्षित परत आणायचं होतं. त्यात धोके भरपूर होते. पण अमेरिकेने ही रिस्क घेतली व जगाला एक थक्क करणारा पराक्रम दाखवला. इराणच्या जाग्रोस पर्वत रांगांमध्ये एक वायू सैनिक अडकला होता. त्याने आपल्या जवळच्या उपकरणाने अमेरिकी सैन्याला आपलं लोकेशन कळवलं होतं. इराणच्या सैन्याने चारही बाजूने या प्रदेशाला घेरलं होतं. ते या सैनिकाच्या जवळ पोहोचत होते. त्याचवेळी अमेरिकन एअर फोर्सने आपल्या फायटर जेट्समधून इराणी सैन्याला रोखण्यासाठी बॉम्ब वर्षाव केला

भारताकडे सुद्धा अमेरिकन बनावटीचं हे विमान

पण या मिशनमध्ये अमेरिकेने कदाचित दोन विमानं वापरली. त्यातील एक विमान त्यांना इराणमध्येच नष्ट करावं लागलं. इराणी मीडियाकडून नष्ट केलेल्या अमेरिकी विमानाचे जे फोटो समोर आले त्यावरुन ते C-130 विमान वाटतय. हे अमेरिकेच ट्रान्सपोर्ट विमान आहे. भारताकडे सुद्धा अमेरिकन बनावटीचं हे विमान आहे. नैसर्गिक संकटात मदत साहित्य पोहोचवण्यासाठी तसच शत्रुच्या प्रदेशात सैनिकाच्या पॅराशूट ड्रॉपसाठी या विमानाचा वापर होते.

विमान का नष्ट केलं?

अमेरिकेने या मिशनसाठी अनेक ट्रान्सपोर्ट विमान, फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टर्स वापरली. यावेळी अमेरिकन सैनिकांनी दोन पैकी एक विमान नष्ट केलं. हे खूप महागडं विमान होतं. जवळपास 10 कोटी अमेरिकन डॉलर या विमानाची किंमत आहे. अमेरिकेने ही विमान वाळवंटी प्रदेशात लँड केली होती. परिस्थिती खूपच जटिल बनलेली. वाळवंटी प्रदेश होता. त्यात विमानात काही तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा वाळवंट असल्याने टेकऑफ शक्य नसावं. त्यामुळे अमेरिकन सैन्याला एक विमान तिथेच नष्ट करावं लागलं. हे विमान नष्ट केलं नसतं, तर अमेरिकेची अत्याधुनिक टेक्नोलॉजी शत्रुच्या हाती लागली असती. म्हणून तिथल्या तिथे हे विमान नष्ट करण्यात आलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.