डोंबिवलीत इमारतीचा स्लॅब कोसळला
एका रहिवाशाच्या पायाला दुखापत; अग्निशमन दलाकडून वयोवृद्ध महिलेची सुटका
डोंबिवली, ता. ६ : पूर्वेतील गोपाळ नगर परिसरात सोमवारी (ता. ६) सकाळी एका ४० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून, इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गोपाळ नगर गल्ली नं. २ मधील ‘आधार’ या तळमजला अधिक चार मजली इमारतीत ही घटना घडली. सोमवारी सकाळी पहिल्या मजल्यावरील गोखले यांच्या घराचा स्लॅब अचानक कोसळून तो थेट तळमजल्यावरील घरावर आदळला. घरातून बाहेर पडत असताना सुमेन विक्टर यांच्या पायाला ढिगाऱ्यामुळे दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत अडकलेल्या एका वयोवृद्ध महिलेला जवानांनी शिताफीने सुरक्षित बाहेर काढले. यामुळे मोठी जीवितहानी टळली.
घटनेनंतर महापालिकेच्या ‘ग’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांनी ताफा घेऊन इमारतीची पाहणी केली. इमारत सुमारे ४० वर्षे जुनी असल्याने आणि देखभालीअभावी कमकुवत झाल्याने हा स्लॅब कोसळल्याचा अंदाज आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इमारत तातडीने रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले असून, रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे डोंबिवलीतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळ्यापूर्वी अशा सर्व इमारतींची तातडीने तपासणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.